मॉर्निंग वॉक ठरला अखेरचा; चालकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2022 16:48 IST2022-02-10T16:48:14+5:302022-02-10T16:48:37+5:30
बीड-धामणगांव-नगर राज्य महामार्गावर चालत जात असताना झाला अपघात

मॉर्निंग वॉक ठरला अखेरचा; चालकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू
कडा ( बीड ) : नेहमीप्रमाणे माॅर्निग वाॅकसाठी घरातून बाहेर पडलेल्या एकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना आष्टी तालुक्यातील घाटापिंपरी येथे आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. राजेंद्र तुकाराम लोंखडे ( ४७ ) असे मृताचे नाव आहे.
घाटापिंपरी येथील राजेद्र तुकाराम लोंखडे हे चालक आहेत. ते रोजच्या सवयीप्रमाणे आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले. बीड-धामणगांव-नगर राज्य महामार्गावर चालत जात असताना नगरहून येणार्या एका भरधाव वाहनाने लोखंडे यांना जोराची धडक दिली. अपघातात गंभीर जखमी लोखंडे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, भाऊ असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच अंभोरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
रस्त्यावर व्यायाम करताना काळजी घ्या
पहाटे अचानक चालकाला झोपेची डुलकी येऊ शकते. एक डुलकी रस्त्यावरील नागरिकाचे आयुष्य संपवू शकते. यामुळे माॅर्निग वाॅक किंवा व्यायामासाठी रस्त्यावर जाताना नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे यांनी केले आहे.