बीड जिल्ह्यातील सत्ता अन् पैशाची मस्ती उतरली पाहिजे; सुप्रिया सुळेंचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 13:05 IST2025-02-19T13:05:09+5:302025-02-19T13:05:53+5:30
तपास यंत्रणेने पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने चालू आहे, कोणता तपास झाला हे जाहीरपणे सांगावे

बीड जिल्ह्यातील सत्ता अन् पैशाची मस्ती उतरली पाहिजे; सुप्रिया सुळेंचा संताप
केज/परळी : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची क्रूरपणे हत्या करणारा आरोपी कृष्णा आंधळे हा ७१ दिवसांपासून फरार आहे. हे कशाचे द्योतक आहे? असा प्रश्न उपस्थित करून बीड जिल्ह्यातील सत्ता आणि पैशाची मस्ती उतरली पाहिजे, असे म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खा. सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला. खा. सुळे यांनी देशमुख व परळीतील महादेव मुंडे कुटुंबाची मंगळवारी भेट घेतली. त्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या.
सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची खा. सुळे यांनी भेट घेत सांत्वन केले. जोपर्यंत देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत. बीड जिल्ह्यातील गुंडा गर्दी संपली पाहिजे, बीडमधील सत्ता आणि पैशाची मस्ती उतरली पाहिजे. गावकऱ्यांनो, सामूहिक अन्नत्याग आंदोलन करू नका, असे आवाहन खा. सुळे यांनी केले. या प्रकरणातील सर्व गुन्हेगार व पोलिस अधीक्षक, पोलिस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक या सर्वांचे सरपंच हत्येपूर्वीपासूनचे व अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणी मागितल्यादरम्यानचे सीडीआर काढून दोषी अधिकारी शोधले पाहिजेत, असेही त्या म्हणाल्या. या प्रकरणातील तपास यंत्रणेने पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने चालू आहे, कोणता तपास झाला हे जाहीरपणे सांगावे, असेही खा. सुळे म्हणाल्या.
न्यायालयीन चौकशीचे स्रोत वाढवा - आ. जितेंद्र आव्हाड
बीड जिल्ह्यात मंत्री धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादाने ज्यांनी, ज्यांनी गुन्हे केले आहेत, अशा अन्यायग्रस्तांची बीड जिल्ह्यात मालिकाच घडली आहे. दोन वर्षांत जिल्ह्यात धुमाकूळ घालून वाटेल तसे गुन्हे करण्यात आले आहेत. हे धक्कादायक असून यांची उकल होण्यासाठी न्यायालयीन चौकशीचे स्रोत वाढविले पाहिजेत, अशी भूमिका आ. जितेंद्र आव्हाड यांनी मांडली.
राजीनामा दिला की सर्वच आरोपी फासावर चढतील - आ. संदीप क्षीरसागर
मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला की सर्वच आरोपी फासावर चढतील. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, ही आपली मागणी आहे. कर्तव्यदक्ष अधिकारी पंकज कुमावत यांना जिल्ह्यात बोलाविण्यात येण्याची मागणीही त्यांनी केली.
सामूहिक अन्नत्याग आंदोलनावर गावकरी ठाम
आमच्या मागण्या प्रशासनाने २५ फेब्रुवारीपर्यंत मंजूर कराव्यात, नसता आम्ही सामूहिक अन्नत्याग आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका मस्साजाेग ग्रामस्थांनी यावेळी मांडली.
हत्येला अनैतिक संबंधाचे वळण देण्याचा प्रयत्न - धनंजय देशमुख
भावाची हत्या झाल्यानंतर रुग्णवाहिका केज पोलिस ठाणे अथवा रुग्णालयात नेण्याऐवजी कळंबकडे नेली जात होती. कळंबमध्ये एक महिला तयार होती. तिला पैसे देऊन छेडछाडीचा आरोप करायचा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याचा प्लॅन होता; परंतु ग्रामस्थांनी पाठलाग केल्याने हा प्लॅन फसला. जर ग्रामस्थांनी पाहिले नसते तर अनैतिक संंबंधाचे वळण दिले असते, असा आरोप धनंजय देखमुख यांनी केला. अशा अनेक घटना यापूर्वी घडल्या असून, अनेकांना समाजातून उठवून लावल्याचेही ते म्हणाले.
महादेव मुंडेंची पत्नी उपोषणावर ठाम
परळीतील महादेव मुंडे यांच्या कुटुंबाचीही खा. सुळे यांनी भेट घेऊन त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्याशी त्यांनी चर्चा केली. आरोपींना अटक का होत नाही, असा प्रश्नही ज्ञानेश्वरी मुंडे यांनी खा. सुप्रिया सुळे यांच्यासमोर उपस्थित केला. खा. सुळे यांनी फोनवरून बीडचे जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्याशी संवाद साधला. या खून प्रकरणातील आरोपीस अटक होत नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळाला असे वाटणार नाही. पोलिसांनी आजपर्यंत तपास केला नाही. पोलिस प्रशासन दोषी आहे. आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी आपण उपोषण करण्यावर ठाम असल्याचेही ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सांगितले.