मुलाच्या मृत्युने बाप खचला; आठवडाभरातच गळफास घेऊन संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 13:52 IST2022-07-15T13:52:07+5:302022-07-15T13:52:53+5:30
आठवडाभरात कुटुंबातील दोन कर्त्या पुरुषांनी जीवन संपवल्याने चोले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मुलाच्या मृत्युने बाप खचला; आठवडाभरातच गळफास घेऊन संपवले जीवन
किल्लेधारूर (बीड ): आठवडाभरापूर्वी आत्महत्याकरून जीवन संपवलेल्या मुलाच्या वडिलाने देखील आत्महत्या केल्याची विदारक घटना आज सकाळी तालूक्यातील असोला येथे उघडकीस आली आहे. मोहन पंढरी चोले ( ५५) असे मृत वडिलाचे नाव आहे. आठवडाभरात दोन कर्त्या पुरुषांनी जीवन संपवल्याने चोले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
तालूक्यातील असोला येथील शेतकरी कुटुंबातील श्रीकृष्ण मोहान चोले याने ८ जुलै रोजी धारूर बसस्थानक परिसरात विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली होती. त्यावेळी त्याचे वडील मोहन चोले पायी दिंडीत पंढरपूरला जात होते. मुलाच्या मृत्यूची वार्ता समजताच माघारी येत जड अंतःकरणाने त्यांनी मुलावर अंत्यसंस्कार केले.
दरम्यान, मुलाच्या मृत्युच्या दु:खाने मोहन चोले अस्वस्थ होते. गुरुवारी काही वेळात परत येतो सांगून चोले घराबाहेर पडले. खूप झाल्यानंरही ते घरी परतले नाहीत. त्यांची शोधाशोध केली असता आज सकाळी कोळपिंप्री शिवारातील लक्ष्मण तांबूरे यांच्या शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी धारूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरु आहे.
मुलगा श्रीकृष्ण याच्या मृत्युच्या आठवडाभरानंतर वडील मोहन यांनी जीवन संपवल्याने चोले कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. दोन्ही मृत्युच्या घटनांवर गावात हळहळ व्यक्त होत आहे. मृत मोहन चोले यांच्या पश्चात मुलगा-सुना, नातवंडे असा परिवार आहे.