बीडमध्ये घड्याळाची टिक-टिक जोरात; कमळ कोमेजले, हा पराभव कोणाचा ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 19:12 IST2025-12-22T19:11:42+5:302025-12-22T19:12:35+5:30
बीड, परळी आणि धारूर या तीन नगरपालिकांमध्ये अजित पवार गटाने नगराध्यक्ष पदासह बहुमताने विजय मिळवला.

बीडमध्ये घड्याळाची टिक-टिक जोरात; कमळ कोमेजले, हा पराभव कोणाचा ?
- अनिल भंडारी
बीड : महायुतीमध्ये एकत्र असूनही बीडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) एकमेकांविरोधात शडु ठोकून उभे होते. मात्र, या 'मैत्रीपूर्ण लढतीत भाजपने मोठी किंमत मोजली असून जिल्हाभरात केवळ एका जागेवर भाजपला समाधान मानावे लागले आहे. याउलट, अजित पवार गटाने तीन नगराध्यक्ष आणि तब्बल ८० नगरसेवक निवडून आणत जिल्ह्यावर आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.
बीड, परळी आणि धारूर या तीन नगरपालिकांमध्ये अजित पवार गटाने नगराध्यक्ष पदासह बहुमताने विजय मिळवला. विशेषतः बीडमध्ये आमदार विजयसिंह पंडितांची रणनीती यशस्वी ठरली. भाजपला केवळ गेवराईमध्ये आपली सत्ता राखता आली.
पेच, पराभव कोणाचा?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह स्थानिक नेत्यांनी ताकद लावूनही भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. महायुतीमधील अंतर्गत कुरघोडी आणि स्थानिक नेत्यांमधील समन्वयाचा अभाव यामुळे हा पराभव 'युतीचा' नसून निव्वळ 'भाजपचा' असल्याचे चित्र दिसत आहे. दुसरीकडे, शरद पवार गटानेही काही ठिकाणी कडवे आव्हान उभे केले, मात्र सत्ता मिळवण्यात अपयश आले.
मुंडे बहीण-भावापुढे खासदारांचे अपयश?
परळीत शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे हे तळ ठोकून होते. मात्र मुंडे बहीण-भावांच्या युतीपुढे करिष्मा चालला नाही. नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा पराभव झालाच, शिवाय ३५ पैकी दोनच नगरसेवक निवडून आले.