दहशत! बिबट्याने महामार्गावर 'नाकाबंदी' केली; बीडमधील आष्टी-नगर रस्त्यावर रात्री थरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 14:39 IST2025-11-10T14:38:25+5:302025-11-10T14:39:14+5:30
आष्टीतील बिबट्याने रात्रीच्या अंधारात गाडीचा रस्ता अडवला, VIDEO व्हायरल

दहशत! बिबट्याने महामार्गावर 'नाकाबंदी' केली; बीडमधील आष्टी-नगर रस्त्यावर रात्री थरार
- नितीन कांबळे
कडा (बीड):बीड-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी रात्री प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. आष्टी तालुक्यातील भवानीनगर तांड्याजवळ एका बिबट्याने थेट रस्त्यावर ठाण मांडले आणि एका वाहनचालकाचा रस्ता अडवल्याचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. बिबट्यांनी आपला अधिवास बदलून आता चक्क रस्त्यावर येऊन बिनधास्तपणे संचार सुरू केल्याने डोंगरपट्ट्यातील नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे.
आष्टी तालुक्यातील विविध गावांच्या डोंगरपट्यात गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्यांचे वास्तव्य आहे. वर्षानुवर्षे त्यांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. वनविभाग 'ठिकाण बदलून वास्तव्य' असल्याचे सांगत असले तरी, जनजागृती पलीकडे ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी बावी येथील एका तरुण शेतकऱ्याचा बिबट्याने जीव घेतला होता. याशिवाय पाळीव श्वान, वासरं आणि शेळ्यांवरही हल्ले झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता तर थेट महामार्गावर वाहनांच्या समोर बिबट्या बिनधास्त फिरत असल्याने, रात्रीच्या वेळी प्रवास करणे अत्यंत धोकादायक बनले आहे.
बिबट्याने रात्रीच्या अंधारात गाडीचा रस्ता अडवला, बीड जिल्ह्यातील आष्टी-नगर रस्त्यावर रात्री थरार #beed#leopardpic.twitter.com/qgFKIp2Ovo
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) November 10, 2025
जीव गेल्यावर पिंजरा लावून काय उपयोग?
समाजसेवक परमेश्वर घोडके यांनी वनविभागाच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. "बिबट्याचा संचार असलेल्या परिसरात वनविभागाने त्वरित पिंजरे बसवावेत. एखाद्याचा जीव गेल्यानंतर पिंजरा बसवून उपयोग काय होईल? वनविभागाने लोकांचा जीव धोक्यात घालू नये," असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
वन पथकांकडून पेट्रोलिंग सुरू
याबाबत आष्टीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे यांना विचारणा केली असता, त्यांनी "शेतकऱ्यांनी वनविभागाच्या सूचनांचे पालन करावे आणि बिबट्या नजरेस पडल्यास घाबरून न जाता खबरदारी घ्यावी," असे सांगितले. तसेच, 'आमच्या पथकांकडून पेट्रोलिंग सुरू आहे,' असे स्पष्टीकरण दिले.