निर्बंधाच्या वेळेतही काय हवे ते सांगा?; दुकाने, हॉटेल्स आतून सुरू, बाहेरून बंद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:20 IST2021-07-24T04:20:13+5:302021-07-24T04:20:13+5:30
प्रशासनाची बघ्याची भूमिका : नागरिकांनीही नियम पाळण्याची गरज लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात येत नसल्याने ...

निर्बंधाच्या वेळेतही काय हवे ते सांगा?; दुकाने, हॉटेल्स आतून सुरू, बाहेरून बंद !
प्रशासनाची बघ्याची भूमिका : नागरिकांनीही नियम पाळण्याची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात येत नसल्याने आष्टी, पाटोदा, गेवराई, शिरूर तालुक्यांत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तसेच बीड शहरातही चार वाजेपर्यंतच आस्थापना सुरू ठेवण्यास परवानगी दिलेली आहे. असे असले तरी निर्बंधांच्या वेळेतही सर्व काही उपलब्ध होत असल्याचे दिसते. दुकाने, हॉटेल्स बाहेरून बंद दिसत असली तरी आतून बिनधास्तपणे आणि पूर्ण क्षमतेने सुरू असल्याचे चित्र बीड शहरासह तालुक्यात दिसत आहे. प्रशासन मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत आहे.
या दुकानांवर लक्ष कोणाचे?
शहरात सर्रासपणे दुकाने उघडी दिसतात. त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी संबंधित पोलीस प्रशासन, नगरपालिका व नगरपंचायत आणि महसूल विभागाची आहे; परंतु या कार्यालयांकडून दुकानांची तपासणीच केली जात नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे शिथिल वेळेतही सर्रासपणे बाजारपेठेत गर्दी असल्याचे दिसते.
किराणा हवा की जेवण?
अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना बीडमध्ये दुपारी चार वाजताच बंद होणे अपेक्षित आहे. परंतु रात्रभर ती चालूच असतात. हॉटेल्स पूर्ण क्षमतेने भरलेले असतात; तर किराणा दुकानही सुरूच असतात. इतर आस्थापनादेखील अर्धे शटर उघडे ठेवून सुरू असल्याचे अनेक ठिकाणी बीड शहरात पाहावयास मिळाले.
कारवाया सुरूच
पोलीस व महसूल प्रशासनाच्या सोबतीने आम्ही कारवाया करतो. तसेच आमच्याकडून जनजागृतीही केली जात आहे. परंतु नागरिकांनीही आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेण्याची गरज आहे.
- डॉ. उत्कर्ष गुट्टे, मुख्याधिकारी, बीड
कोरोनाकाळात वसूल झालेला दंड
पहिल्या लाटेनंतर ४,८६,०००
दुसऱ्या लाटेनंतर ७,२७,०००