परळी (बीड): मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या हत्येचा कट रचल्याचा थेट आरोप कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली होती. या अत्यंत गंभीर आरोपांवर धनंजय मुंडे यांनी आज परळी येथे पत्रकार परिषद घेऊन जोरदार प्रत्युत्तर दिले. "कट प्रकरणी बोलणारे, अटक झालेले आणि कबुली देणारे सर्वजण जरांगे यांचेच कार्यकर्ते आहेत," असा दावा करत मुंडे यांनी या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
जरांगे पाटील यांनी केलेल्या 'अडीच कोटींची सुपारी', 'भाऊबीजेला भेट' आणि 'कटासाठी जुनी गाडी देण्याचे आश्वासन' या सर्व आरोपांना मुंडे यांनी 'हास्यास्पद' आणि 'निरर्थक' ठरवले. "हे सर्व आरोप खोटे आहेत. या कटामागील सत्य बाहेर आलेच पाहिजे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही," असे धनंजय मुंडे यांनी ठणकावून सांगितले. तसेच या आरोपांचे सत्य बाहेर काढण्यासाठी धनंजय मुंडे यांनी स्वतःची आणि मनोज जरांगे पाटील यांची 'ब्रेन मॅप' आणि 'नार्को टेस्ट' करण्याची तयारी दर्शवली आहे.
'त्यांचा दोन समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न'मुंडे यांनी जरांगे यांच्या भूमिकेवरही गंभीर टीका केली. "एका समाजाला संपविण्याची भाषा अंतरवाली येथून सुरू झाली आणि दोन समाजात फूट तेथूनच पडली," असे मुंडे म्हणाले. धनंजय मुंडे म्हणाले, "जरांगे तुम्हाला एका समाजाने डोक्यावर घेतले आहे, पण थोतांड करू नका. केवळ ओबीसी आरक्षणाची बाजू घेतो म्हणून आमच्यावर विनाकारण खोटे आरोप केले जात आहेत. आम्हाला संपूर्ण समाज एकत्र करायचा आहे, म्हणून आम्ही शांत आहोत."
वकिलांशी चर्चा करून पुढील पाऊलमुंडे यांनी यापूर्वी जरांगे पाटील यांच्यावर केवळ एकाच सभेत टीका केली होती, मात्र त्यानंतर त्यांनी शांतता राखली होती. आता वकिलांशी चर्चा करून पुढील कायदेशीर पाऊल उचलणार असल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले. तसेच मुंडे यांनी जरांगे यांच्या मेव्हण्यावर वाळू तस्करीचा आरोप करत, "कोणाच्या गाडीत मोबाईल टाकणे, गाडीचे लोकेशन ट्रेस करणे, हेच काम आहे का?" असा सवाल केला.
जुना सहकारीच संशयित
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा गंभीर कट उघडकीस आल्यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. अडीच कोटी रुपयांची सुपारी देऊन हा घातपाताचा कट रचण्यात आला असल्याची तक्रार जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यांनी बुधवारी रात्री पोलीस अधीक्षकांकडे दिली होती. या प्रकरणी गेवराई तालुक्यातील अमोल खुणे आणि विवेक उर्फ दादा गरुड या दोन संशयित आरोपींना जालना स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी मध्यरात्री चौकशीसाठी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी एक आरोपी हा मनोज जरांगे पाटील यांचा जुना सहकारी असल्याचे समोर आले आहे.
जरांगे यांनी धनंजय मुंडेंवर काय केले होते आरोप
धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत मनोज जरांगे म्हणाले, हत्येसाठी तब्बल अडीच कोटी रुपयांची सुपारी ठरली होती, त्यापैकी ५० लाख रुपये देण्यात आले होते. बीडमधील कांचन नावाचा व्यक्ती धनंजय मुंडे यांचा पीए (कार्यकर्ता) आहे. त्याने दोन आरोपींपैकी एका आरोपीला त्याने परळीला नेले होते. त्यानंतर भाऊबीजेच्या दिवशी झाल्टा फाटा येथे धनंजय मुंडे यांनी या आरोपींची भेट घेतली. 'आम्ही त्याला ठोकतो' असे आरोपींनी सांगितल्यावर, मुंडे यांनी 'मी जुनी गाडी देतो' असे आश्वासन दिले. "या घातपाताच्या कटाचे मूळ धनंजय मुंडे आहे.'' असा दावा जरांगे यांनी केला. तसेच खून करून राजकारणामध्ये माणूस मोठा होत नाही. हा प्रकार गंभीर आहे, सर्वांनी हुशार होणे गरजेचे आहे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
Web Summary : Dhananjay Munde vehemently denies Jarange Patil's assassination plot allegations, calling them absurd. He demands a CBI inquiry and offers brain mapping, narco tests to prove innocence. Munde accuses Jarange of dividing communities, urging him to stop falsehoods. He plans legal action, highlighting a suspect's connection to Jarange.
Web Summary : धनंजय मुंडे ने जरांगे पाटिल के हत्या की साजिश के आरोपों का जोरदार खंडन किया, उन्हें बेतुका बताया। उन्होंने सीबीआई जांच की मांग की और बेगुनाही साबित करने के लिए ब्रेन मैपिंग, नार्को टेस्ट की पेशकश की। मुंडे ने जरांगे पर समुदायों को विभाजित करने का आरोप लगाया, उनसे झूठ बंद करने का आग्रह किया। उन्होंने कानूनी कार्रवाई की योजना बनाई, जरांगे से एक संदिग्ध के संबंध पर प्रकाश डाला।