जातेगावात महिलेचा संशयास्पद मृत्यू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 23:33 IST2019-12-22T23:32:39+5:302019-12-22T23:33:12+5:30
शनिवारी रात्री शेतात पती-पत्नी गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी दोघेही गेले होते. रविवारी पहाटे पत्नीचा संशयास्पद मृतदेह आढळून आला

जातेगावात महिलेचा संशयास्पद मृत्यू!
गेवराई : शनिवारी रात्री शेतात पती-पत्नी गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी दोघेही गेले होते. रविवारी पहाटे पत्नीचा संशयास्पद मृतदेह आढळून आला असल्याने जातेगाव येथे एकच खळबळ उडाली सदर महिलेचा पतीने खून केला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान या घटनेनंतर पती फरार झाला आहे.
गेवराई तालुक्यातील जातेगाव येथील रोहिदास लिंबा पवार हे पत्नी निला रोहीदास पवार (वय ४०) दोघेही २१ डिसेंबर रोजी रात्री गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते, काही वेळाने वीज खंडित झाली. तरी देखील दोघे घरी परत आले नाहीत. सकाळी पवार यांच्याच कुटुंबातील महिला शेतात गेली होती. यावेळी तिला निला पवार यांचा मृतदेह शेजाऱ्याच्या ज्वारीच्या शेतात आढळून आला. मात्र, यावेळी त्याठिकाणी कोणीही नव्हते तसेच मृताचा पती रोहीदास हा घटना स्थळी नसल्यामुळे या महिलेला संशय आला. तिने तात्काळ आरडा-ओरड करत घडलेल्या घटनेची माहिती दिली. गाकऱ्यांनी लगेचेच घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती तलवाडा पोलिसांना दिली. यावेळी सपोनि सुरेश उनवणे आपल्या कर्मचाºयांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरात पाहणी करून घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर निला पवार यांचे प्रेत उत्तरीय तपासणीसाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.