Suresh Dhas: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे वातावरण ढवळून निघालं आहे. या प्रकरणातील इतर आरोपींना अटक करण्यात आली असली तर कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे. पोलीस यंत्रणा त्याच्या शोधावर असून दोन महिन्यांपासून तो गायब आहे. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरलं असताना त्यांच्यासोबत फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. फरार कृष्णा आंधळेला घेऊन येतो म्हणत एकाने सुरेश धस यांची पाच हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. मस्साजोगच्या ग्रामस्थांशी संवाद साधत असताना सुरेश धस यांनी या प्रकाराबाबत माहिती दिली.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात काही मागण्यांसाठी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी दोन दिवस अन्नत्याग आंदोलन केले. पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन बुधवारी मागे घेण्यात आलं. यावेळी भाजपचे आमदार सुरेश धस हे देखील उपस्थित होते. गावकऱ्यांशी संवाद साधताना सुरेश धस यांनी फरार कृष्णा आंधळेच्या नावावर आपली फसवणूक झाल्याचे सांगितले. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा तीन महिन्यांपासून फरार असून अद्याप त्याचा शोध लागलेला नाही.
अशातच कृष्णा आंधळे याला घेऊन येतो असं सांगून एकाने सुरेश धस यांची पाच हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचीही त्याच व्यक्तीने फसवणूक केल्याचं समोर आलं. बजरंग सोनवणे यांनाही या व्यक्तीने फोन करुन कृष्णा आंधळे हा छत्रपती संभाजीनगरमध्ये असल्याचे सांगितले होते. मात्र नंतर हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे समोर आले.
"बापूराव बारगजे या व्यक्तीचा मलासुद्धा फोन आला होता. तो मला म्हणाला की कृष्णा आंधळे इथे आहे. त्याला कॅबमध्ये बसवून आणायचे आहेत पैसे पाठवा. मी त्याला पाच हजार रुपये पाठवले. मला त्याने साडेचार तास नगरला उभे केले. हॉनगरमधल्या हॉटेल यश पॅलेसला मी साडेचार तास वाट बघत बसलो पण तो आला नाही. त्याला पकडावं यासाठी मी आष्टीच्या पोलिसांना सोबत नेलं होतं. तो बारगजे नावाचा माणूस फ्रॉड निघाला. दोन-पाच रुपये कमावणाऱ्या या औलादी आहेत. मी पोलीस अधिक्षकांना फोन करुन याची माहिती दिली. अशा घटनांमधून दोन पाच रुपये कमावणाऱ्या व्यक्तीसुद्धा असू शकतात," असं सुरेश धस म्हणाले.