तालुक्यातील दिंद्रुड येथील तत्कालीन उपसरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमत करून एका माजी सैनिकास शासकीय जमिनीवरील प्लॉट विकला. यासाठी पंचायत समिती कार्यालयासमोर एक महिन्यापूर्वी उपोषण केले होते. सदरील एक महिन्यात जागेची मोजणी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे गटविकास अधिकारी यांनी सांगितले होते. मात्र, या उपोषणाला एक महिना उलटूनही राजकीय दबावापोटी काहीच कारवाई न केल्याने गुरूवारपासून माजी सैनिकाने आपल्या कुटुंबासह पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
१५ ऑक्टोबर २०१८ रोजी दिंद्रुड येथील ग्रामपंचायत कार्यालयअंतर्गत कार्यरत असलेले ग्रामसेवक राजकुमार झगडे व उपसरपंच युवराज ठोंबरे व गणपत ठोंबरे यांनी येथील गट नंबर ७१४ मध्ये कुठलाही वारस नसणारा शासकीय प्लॉट विक्री केला. यावेळी बनावट दस्तावेज तयार करून जागेचा बांधकाम परवाना गणपत ठोंबरे यांच्या नावे असल्याचा देखावा केला.
दरम्यान, माजी सैनिक असणाऱ्या सुरेश मुंडे यांच्या पत्नी सुमन मुंडे यांना त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत हा प्लॉट ग्रामसेवक झगडे व उपसरपंच ठोंबरे यांनी विक्री केला. कालांतराने शासकीय कामासाठी प्लॉटची ओरिजनल कागदपत्रे लागत असल्याने सुरेश मुंडे यांनी पीटीआर काढण्यासाठी ग्रामपंचायत येथे गेले असता हा प्लॉट शासकीय असल्याची बाब उघड झाली.
यावेळी त्यांनी संबंधित उपसरपंच युवराज ठोंबरे, ग्रामसेवक झगडे यांना याचा जाब विचारला असता त्यांनी सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे दिली व शेवटी जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. झालेल्या अन्यायाची दाद मागण्यासाठी माजी सैनिक मुंडे यांनी बीडपासून अनेक कार्यालयांसमोर उपोषण केले आहे. मात्र, कुठेच दाद न मिळाल्याने शेवटी त्यांनी आपल्या अपंग मुलांसह परिवारास सोबत घेऊन पंचायत समिती कार्यालयासमोर १७ व १८ जानेवारी रोजी उपोषण केले. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणामुळे उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडल्याने प्रशासनाची मोठी धांदल उडाली होती. यानंतर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी हे उपोषण सोडण्यास भाग पाडले होते. यावेळी येथील गटविकास अधिकारी प्रज्ञा माने यांनी एक महिन्यात जमीन मोजून यावर निर्णय घेण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले होते. परंतु, राजकीय दबावापोटी ४० दिवस उलटूनही सदरील जागेचे मोजमाप होऊ शकले नाही.यामुळे माजी सैनिक सुरेश मुंडे यांनी गुरुवारपासून पंचायत समिती कार्यालयासमोर पुन्हा उपोषण सुरू केले आहे.
दोषींवर कारवाई करणार
संबंधित माजी सैनिकांच्या जागेची मोजणी मार्चच्या पहिल्या आठवड्यात करून देण्यात येईल व यात कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करणार येणार आहे.
रामचंद्र रोडेवाड, सहाय्यक गटविकास अधिकारी, माजलगाव