समृद्ध गावासाठी प्रशासनाने दिले बळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:25 IST2021-01-10T04:25:41+5:302021-01-10T04:25:41+5:30
धारूर : पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत आयोजित ‘ समृद्ध गाव समृद्ध संवाद’ उपक्रमात ...

समृद्ध गावासाठी प्रशासनाने दिले बळ
धारूर
: पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत आयोजित ‘ समृद्ध गाव समृद्ध संवाद’ उपक्रमात जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी तालुक्यातील १२ गावातील ग्रामस्थांशी संवाद साधत गाव समृद्ध करण्याची इच्छा बाळगणाऱ्या ग्रामस्थांना प्रशासनाकडून बळ दिले.
या उपक्रमात संतोष शिनगारे यांनी वॉटर कप स्पर्धेत केलेल्या कामांबद्दल गावांचे कौतुक करून समृद्ध गाव स्पर्धेचा आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल आढावा मांडला. येत्या २५ फेब्रुवारीअखेर १२० गुणांच्या अनुषंगाने काम करण्याविषयी सविस्तर माहिती दिली.
जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी ग्रामस्थांशी ओळख करून घेत त्यांच्या गावातील समस्या जाणून घेतल्या.
यावेळी नरेगा कृती आराखडा व काही कामे वाढवून पुरवणी कृती आराखडा तयार करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. वॉटर बजेटमधील तूट भरून काढणे,ई-पीक पाहणी पद्धतीबदल सविस्तर माहिती दिली. त्यानुसार आपल्या गावातील शेतात जाऊन सर्वानी आपले पिके त्या अप्लिकेशनमध्ये नोंदवण्याची त्यांनी सूचना केली. गावातील राहिलेली जलसंधारणाची कामे करावीत, तलावातील गाळ काढण्यासाठी, ओढ्याचे खोलीकरण व रुंदीकरण,बांधबंदिस्तीसाठी प्रशासनाच्या वतीने जेसीबी उपलब्ध करून देण्यात येईल, गावकऱ्यांनी फक्त डिझेलची व्यवस्था करावी. त्या अनुषंगाने अर्ज, प्रस्ताव नरेगा विभागात द्यावेत, असे या संवादात जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. पोखरा योजनेतून लवकरात लवकर सर्व लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवावेत अशाही सूचना दिल्या. प्रत्येक पीक निहाय फार्मर प्रोड्युसर कंपनी तयार करण्याचा सल्लाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. तसेच सुगंधी तेलाच्या व औषधी वनस्पती, मत्स्य पालन, मधुमक्षिका पालन , अशा व्यवसायास सुरुवात करावी, असे आवाहन केले.
पाणी फाऊंडेशनचे विभागीय समन्वयक संतोष शिनगारे,तालुका समन्वयक नितीन पाटोळे यांनी बैठकीचे नियोजन केले.
टँकर बंद, फळबागा वाढल्या
आमला, देवठाणा,हिंगणी बू, शिंगणवाडी, व्हरकवाडी, अंजन डोह, मोरफळी, कारी, आंबेवड गाव, खोडस, कोळ पिंपरी, जायभायवाडी येथील सरपंच व जलमित्रांनी वाॅटरकप स्पर्धेतील प्रवास जिल्हाधिकाऱ्यांपुढे मांडला. अनेक गावातील टँकर बंद झाले. फळबागांचे क्षेत्र वाढवल्याचे यावेळी गावकऱ्यांनी सांगितले.
मनसंधारणातून जलसंधारण
समृद्ध गावमधील श्रमदान करून गावातील गट तट नष्ट केले व मनसंधारणातून जलसंधारण व जलसंधारणाच्या माथ्यावरच्या उपचाराबरोबरच गावातील लोकांच्या मनावर व माथ्यावर उपचार करुन गाव टँकरमुक्त केले,समृद्ध गावही नक्कीच करू, असा विश्वास देत जिल्ह्यधिकाऱ्यांनी या गावांचे कौतुक केले.
सकारात्मक उर्जा
नवीन वर्षात पदार्पण करताना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनाने एक सकारात्मक शक्ती,ऊर्जा मिळाली आहे. ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत चांगले काम केले. गाव पाणीदार झाल्यास जेवढा आनंद आम्हाला झाला तेवढाच आनंद तीन तास जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातून झाला. याची फलश्रुती ग्रामस्थ लवकरच आपल्या कामातून दाखवून देतील. -- शेषेराव गडदे, सरपंच,मोरफळी.