जातीयवाद संपविण्यासाठी पाऊल; बीड पोलिसांना मिळेल फक्त पहिल्या नावाची नेमप्लेट!
By सोमनाथ खताळ | Updated: February 27, 2025 11:24 IST2025-02-27T11:23:41+5:302025-02-27T11:24:30+5:30
बीड पोलिस अधीक्षकांचा निर्णय; आडनाव नकोच, फक्त पहिल्या नावाची नेमप्लेट; काय आहे संकल्पना

जातीयवाद संपविण्यासाठी पाऊल; बीड पोलिसांना मिळेल फक्त पहिल्या नावाची नेमप्लेट!
बीड : जिल्ह्यातील जातीयवाद संपविण्याआधी पोलिसांच्या मनातून ‘जात’ काढण्यासाठी पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी पहिल्या नावाने बोलण्याचा आदेश काढला. त्यानंतर आणखी एक पाऊल पुढे टाकत कार्यालयीन व प्रत्येक ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या टेबलवर आता पहिल्या नावाची पाटी लागणार आहे. त्यामुळे सामान्य लोकही पहिल्या नावाने बोलतील आणि कोणाचीही ‘जात’ समजणार नाही. यातून सलोखा वाढणार आहे.
लोकसभा निवडणुकीपासून जिल्ह्यात जातीयवाद वाढला आहे. विधानसभेत तो आणखी बळकट झाला. सध्या तर पोलिस दलातील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांवरही ‘जाती’चे आरोप होत आहेत. असे असतानाच ९ डिसेंबर २०२४ रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि पोलिस अधीक्षक बदलले. २१ डिसेंबर २०२४ रोजी नवनीत काँवत यांची बीडला नियुक्ती झाली. त्यांनी आगोदर पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना पहिल्या नावाने बोलण्यासंदर्भात आदेश काढून आवाहन केले. याला यशही आले. त्यानंतर आता त्यांनी प्रत्येक पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्या टेबलवर केवळ पहिल्या नावाची नेमप्लेट देण्याचा निर्णय घेतला आहे. १ मार्च पासून याची अंमलबजावणी होणार आहे.
काय आहे संकल्पना ?
आडनावाने बोलल्याने अनेकांची जात लक्षात येते. हे न समजता सलोखा राहावा, यासाठी पहिल्या नावाने बोलण्याची संकल्पना हाती घेतली. याला यश आल्यानंतर आता प्रत्येक पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांसह बीट अंमलदारांना पहिल्या नावाची नेमप्लेट पोलिस दलाकडून दिली जाणार आहे. हे नाव निळ्या रंगात राहणार असून नावाच्या बाजूला 'महाराष्ट्र पोलिस' असा लोगो असेल. अभिमान वाटावा आणि काम करण्याची प्रेरणा मिळावी, यासाठी हे केले जाणार आहे.
अंमलदारांना पेन, पेपरही मिळणार
पोलिस ठाण्यात काम करणारे अंमलदार हे स्वखर्चातून पेन, पेपर खरेदी करतात. परंतु, शासकीय काम असल्याने त्यांना हा भुर्दंड बसू नये, यासाठी पेन, पेपरसह इतर स्टेशनरी दिली जाणार आहे. त्याची खरेदीही करण्यात आली आहे.
आदेश काढला आहे
मी स्वत: सर्वांना पहिल्या नावाने बोलतो. तसेच, इतरांनीही बोलण्यासंदर्भात आदेश काढला आहे. आता प्रत्येक बीट अंमलदार यांना त्यांच्या टेबलवर ठेवण्यासाठी पहिल्या नावाची नेमप्लेट देत आहोत. त्याखाली महाराष्ट्र पोलिस असे लिहिलेले असेल.
- नवनीत काँवत, पोलिस अधीक्षक, बीड