वीज तारांत अडकलेल्या झाडांच्या फांद्या तोडणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:23 IST2021-07-01T04:23:36+5:302021-07-01T04:23:36+5:30
... घाटरस्ता रुंदीकरणाची मागणी धारूर : खामगाव- पंढरपूर मार्गावर असलेल्या तीन किलोमीटर घाट रस्ता अरुंद बनला आहे. यामुळे याठिकाणी ...

वीज तारांत अडकलेल्या झाडांच्या फांद्या तोडणी सुरू
...
घाटरस्ता रुंदीकरणाची मागणी
धारूर : खामगाव- पंढरपूर मार्गावर असलेल्या तीन किलोमीटर घाट रस्ता अरुंद बनला आहे. यामुळे याठिकाणी अपघाताची शक्यता वाढली आहे. वारंवार मागणी करूनही गेल्या अनेक वर्षांपासून घाटांचे रुंदीकरण केले नाही. तरी या घाट रस्त्याचे रुंदीकरण करावे, अशी मागणी वाहन चालकांतून होत आहे.
....
कर्जवाटपास बँकांकडून टाळाटाळ
आष्टी : तालुक्यात सध्या खरीप पीककर्जाचे वाटप सुरू आहे; परंतु कर्जवाटपास बँकांकडून विलंब होत आहे. शेतकरी मात्र कर्जासाठी बँकेत हेलपाटे मारताना दिसत आहेत. तरी बँकांनी शेतकऱ्यांना तातडीने कर्जवाटप करावे, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे.
...
पीकविमा भरण्यासाठी पैसे नाहीत
आष्टी : कोरोनामुळे आधीच शेतकरी अडचणीत आला आहे. त्यात खरिपाच्या पेरणीचे बी-बियाणे, खते खरेदीसाठी, तसेच शेतीच्या मशागतीसाठी शेतकऱ्यांना उधारी, उसनवारी करावी लागली. त्यात आता पीकविमा भरण्याची मुदत १५ जुलै आहे. त्याचा खर्च आल्याने सध्या पीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. विमा कसा भरावा, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.
...
रस्ता दुरुस्तीची मागणी
कडा : तालुक्यातील दादेगाव ते भोजेवाडीदरम्यान रस्त्यावरील डांबरीकरण पूर्णपणे उखडले आहे. गेल्या दहा वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती केली नाही. सध्या या रस्त्याला खड्डे पडल्याने वाहनचालकांना त्रास होत आहे. तरी या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
...
पिकांवर रोग
कडा : परिसरात अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर मूग, तूर, उडीद पिकांची पेरणी केली आहे. गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. या वातावरणामुळे या पिकांवर रोग पडला आहे. यामुळे शेतकरी अनेक ठिकाणी फवारणीच्या कामात व्यस्त दिसत आहेत.
....
नाल्या तुंबल्याने पाणी रस्त्यावर
गेवराई : गेल्या आठवड्यात गेवराई शहरात जोरदार पाऊस झाला. येेथील राजगल्लीत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे नालीतील घाण पाणी रस्त्यावर आले होते. या पाण्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले होते. तरी पालिकेने नाल्यांची स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.
...
जनावरांचा बाजार सुरू करण्याची मागणी
कडा : येथील बाजारात रविवारी जनावरांचा मोठा बाजार भरतो; परंतु गेल्या अनेक दिवसांपासून जनावरांचा बाजार भरणे बंद आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. तरी जनावरांचा बाजार सुरू करावा, अशी मागणी होत आहे.
....
ऑनलाइन शिक्षणागुळे मोबाइल, लॅपटॉपला मागणी
धानोरा : सध्या सर्वच शाळांमध्ये ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू आहे. यासाठी मुलांना मोबाइल, लॅपटॉप पालकांकडून खरेदी सुरू आहे. यामुळे बाजारात मोबाइल, लॅपटॉपला मागणी वाढली आहे. मोबाइलमधूनच मुले आता ऑनलाइन शिक्षण घेत आहेत.
...
उकाड्याने नागरिक त्रस्त
धानोरा : आष्टी तालुक्यातील धानोरा परिसरात गेल्या तीन- चार दिवसांपासून रोज दुपारी कडक ऊन पडत आहे. यामुळे उकाडा वाढला आहे. या उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यात वारंवार वीज प्रवाह खंडित होत आहे. यामुळे रात्री डासांचा प्रादुर्भाव वाढत असून, नागरिकांंना त्रास सहन करावा लागत आहे.
....
पुलाच्या कामाला गती देण्याची गरज
बीड : राजुरी- बीड रोडदरम्यान रेल्वेपुलाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. काम संथगतीने चालू आहे. या पुलाच्या कामामुळे येथे रोज वाहतुकीची कोंडी होत आहे. पुलाशेजारीच रस्त्यावर चिखल साचत असल्याने याचा दुचाकीस्वारांना त्रास होत आहे. तरी या पुलाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
....
खुंटेफळ-लोणी रस्त्यावर खड्डे
धानोरा : आष्टी तालुक्यातील धानोरा- लोणी रस्त्यावर जागोजागी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांचा दुचाकी, चारचाकी वाहनांना होत आहे. या रस्त्यावर वाहनांची वर्दळदेखील वाढली आहे. रेल्वेच्या कामासाठी या रोडवर रोज अवजड वाहने धावतात. त्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. तरी या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
....
मोकाट जनावरांचा वावर वाढला
बीड : शहरात महामार्गावर, गल्लोगल्ली मोकाट जनावरांची संख्या वाढली आहे. याचा लहान, मुले, महिला, वृद्धांना त्रास होत आहे. रात्री, दिवसा मोकाट जनावरे रस्त्यावरच बसलेली असतात. याचा वाहन चालकांनाही त्रास होतो. अनेक वेळा वाहतुकीसही अडथळा होतो. तरी पालिकेने या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
.....