एसटी तुडुंब, ट्रॅव्हल्सचालकांकडून प्रवाशांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 00:53 IST2018-11-11T00:52:55+5:302018-11-11T00:53:23+5:30
राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस कमी पडत असल्याने खाजगी ट्रॅव्हल्सकडे ग्राहक वळले आहेत. मात्र त्यांना पुणे, मुंबईला जाण्यासाठी नेहमीपेक्षा तिप्पट भाडे मोजण्याची वेळ आली आहे.

एसटी तुडुंब, ट्रॅव्हल्सचालकांकडून प्रवाशांची लूट
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : नुकतीच दिवाळी झाल्याने आता आपल्या कामाच्या ठिकाणी पोहचण्यासाठी लगबग सुरु झाली असून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस कमी पडत असल्याने खाजगी ट्रॅव्हल्सकडे ग्राहक वळले आहेत. मात्र त्यांना पुणे, मुंबईला जाण्यासाठी नेहमीपेक्षा तिप्पट भाडे मोजण्याची वेळ आली आहे. ट्रॅव्हल्स चालकांकडून मागील आठ दिवसांपासून लूट सुरु आहे.
राज्य परिवहन महामंडळाने यंदा दिवाळीच्या तोंडावरच प्रवासी भाड्यात दहा टक्के वाढ केली. तर सणानिमित्त बीड विभागातील सर्व आगारातून किमान ५ व जास्तीत जास्त ७ बसेस मुंबई, पुणे मार्गावर सोडल्या. त्याचबरोबर औरंगाबाद मार्गावरही जादा बसेसच्या फेऱ्या सुरु ठेवल्या. बीड यथून सोलापूरसाठी शिवशाहीच्या चार बसेस सुरु करण्यात आल्या. मुंबई, पुणे, औरंगाबाद, चंद्रपूर, हैदराबादसाठी जवळपास ३७ शिवशाही बस सुरु आहेत. दिवाळी सुटीत येणा-या विद्यार्थी व नोकरदारांची संख्या पाहता आरक्षणाची सुविधा केली. बीड येथून जाणा-या बसेसचे आरक्षण पुर्ण फुल झाले आहे. गर्दी वाढतच असल्याने व पर्यायी बस उपलब्ध नसल्याने प्रवाशांना खाजगी ट्रॅव्हल्सकडे वळले आहे. ही गर्दी वाढल्याने ट्रॅव्हल्सचालकांनी संधी साधत सुरुवातीला दुप्पट तर सध्या तिप्पट दर आकारणे सुरु केले आहे. बीड येथून जवळपास २० खाजगी ट्रॅव्हल्स चालक प्रवासी वाहतूक करतात. बीड ते पुणेसाठी एरव्ही ३०० ते ४०० रुपये भाडे होते. ते सध्या ६०० ते ७०० रुपये आकारले जात आहे. तर मुंबईसाठी प्रती प्रवासी भाडे १६०० ते १७०० रुपये आकारले जात आहे. त्याचबरोबर एकूण क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरण्याचे कामही होत आहे. सोमवारपासून आठवड्याचे कार्यालयीन कामकाज तसेच शैक्षणिक वर्ग, परीक्षेची तयारी यामुळे शनिवार आणि रविवारी जाणाºया प्रवाशांची संख्या वाढली आहे. रविवारसाठी तर शनिवारपेक्षा शंभर रुपये तिकिटामागे जादा आकरले जात आहे.