Speed up the investigation to uncover serious crimes - Harsh Poddar | गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी तपासाला गती द्यावी- हर्ष पोद्दार
गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी तपासाला गती द्यावी- हर्ष पोद्दार

ठळक मुद्देजिल्हा अधीक्षक कार्यालयात अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

बीड : मगील काही महिन्यांपासून जिल्ह्यात जबरी चोºया, घरफोड्या तसेच दरोडा यासारखे गंभीर गुन्हे घडले आहेत. याचा तपास अधिक गतिने करून तात्काळ आरोपींना मुद्देमालासह अटक करावी. तसेच नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाची प्रतिमा अधिक उंचावेल यासाठी तात्काळ गुन्हे उघडकीस आणावेत अशा सूचना पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिल्या. ते बुधवारी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत बोलत होते.
यावेळी बीडचे अप्पर अधीक्षक विजय कबाडे, अंबाजोगाईच्या स्वाती भोर, बीडचे उपअधीक्षक भास्कर सावंत, केजचे उपअधीक्षक अशोक आम्ले, स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक भारत राऊत, दरोडा प्रतिबंधक पथकाचे सहायक निरीक्षक गजानन जाधव, माजलगाव शहर ठाण्याचे निरीक्षक सय्यद सुलेमान, केजचे निरीक्षक पुरुषोत्तम चोबे, बीड ग्रामीण ठाण्याचे सहायक निरीक्षक सुजित बडे यांची उपस्थिती होती.
गेल्या काही दिवसांपासून जबरी चोºया, घरफोड्या, चोरी तसेच दरोड्याचे गुन्हे वाढले आहेत. केज तालुक्यातील दहीफळ वडमाऊली येथे मंदिरात पुजारी रामलिंग ठोंबर यांची हत्या करुन दानपेटी फोडल्याची घटना ३ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली होती. त्यानंतर बीड ग्रामीण हद्दीतील गोरेवस्तीवर ११ नोव्हेंबर रोजी पहाटे एका कुटुंबावर सशस्त्र हल्ला करुन दरोडा टाकला होता. बीड तालुक्यातील नवगण राजुरी येथे १ नोव्हेंबर रोजी पहाटे चोरांनी गणपती मंदिरातील दानपेटीवर डल्ला मारला होता. माजलगाव शहर ठाणे हद्दीत देखील दरोड्याची घटना घडली होती. हे सर्व गंभीर गुन्हे असून, याचा तपास रखडला आहे. दरम्यान, या सर्व गंभीर गुन्ह्यांचा तपास पोलीस करत आहेत मात्र, अजून अरोपी अटकेत आलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी आपल्या दालनात आढावा बैठक घेतली होती. या गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलीस ठाणे स्तरावर तसेच गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथकाने आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीची माहिती त्यांनी जाणून घेतली. तसेच गुन्हे तात्काळ निकाली काढण्याच्यासंदर्भात संबधित अधिकाऱ्यांना पोद्दार यांनी विविध प्रकारच्या सूचना केल्या.

Web Title: Speed up the investigation to uncover serious crimes - Harsh Poddar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.