पैसे फेकताच ढेकळातील दारू टेबलावर येतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:31 IST2021-04-12T04:31:16+5:302021-04-12T04:31:16+5:30

स्टींग ऑपरेशन सोमनाथ खताळ बीड : कोरोनाला रोखण्यासाठी ब्रेक द चेन नियमावली राबविली जात आहे. यात दारू विक्रीला पूर्णपणे ...

As soon as the money is thrown, the liquor in the lump comes to the table | पैसे फेकताच ढेकळातील दारू टेबलावर येतेय

पैसे फेकताच ढेकळातील दारू टेबलावर येतेय

स्टींग ऑपरेशन

सोमनाथ खताळ

बीड : कोरोनाला रोखण्यासाठी ब्रेक द चेन नियमावली राबविली जात आहे. यात दारू विक्रीला पूर्णपणे बंदी आहे. परंतु, बीड शहरासह परिसरातील अनेक हॉटेलमध्ये सर्रासपणे जादा पैसे फेकताच दारू मिळत आहे. हॉटेलमध्ये दारू न ठेवता परिसरातील जमिनीतील नांगरट, विहीर आदी ठिकाणी लपविण्याची शक्कल लढविली जात आहे. वीकेंड लॉकडाऊन असतानाही हॉटेलचालकांकडून जेवणाऐवजी दारूचे ‘पार्सल’ दिले जात आहे. ‘लाेकमत’ने रविवारी हा सर्व प्रकार स्टींग ऑपरेशन करून चव्हाट्यावर आणला.

राज्यासह जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून ब्रेक द चेन नियमावली जाहीर करण्यात आली. यात शनिवार व रविवार असे दोन दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले. यात अत्यावश्यक सेवांना मुभा देण्यात आली होती. तर हॉटेलमधूनही पार्सल सुविधेला परवानगी दिली होती. परंतु शहरासह लगत असलेल्या काही हॉटेलमधून जेवणाऐवजी चक्क दारूच पार्सल केली जात असल्याचे उघड झाले आहे. तसेच काही ठिकाणी हॉटेलमध्ये बसून जेवणाचा आस्वाद घेतला जात आहे. यासाठी ग्राहकांकडून जादा पैसे घेतले जात आहेत. असे नियमांचे उल्लंघन होत असतानाही प्रशासनाकडून होत असलेली डोळेझाक संशय व्यक्त करणारी आहे. अशा या प्रकारामुळेच कोरोना संसर्ग कमी होत नसून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यावर कारवाई करून कोरोनाला रोखण्यासाठी दिलेल्या सूचनांचे सामान्यांसह सर्व आस्थापना चालकांनी पालन करावे, असे आवाहनही करण्यात येत आहे.

बाहेरून कुलूप, आतमध्ये धिंगाणा

काही हॉटेलची पाहणी केली असता अनेक ठिकाणी बाहेरून कुलूप दिसले. परंतु, मागील दरवाजातून सर्रासपणे बसून जेवण व दारूची सुविधा पुरविली जात होती. जे हॉटेल शहरालगत आहेत, तेथे हॉटेल शेजारीच असलेल्या झाडांखाली ग्राहकांची सोय केली जात आहे. त्यांना ढेकळात, गवतात ठेवलेली दारू ‘पार्सल’ करण्याची व्यवस्थाही करण्यात आलेली होती.

१५० ची बाटली २५० रुपयांना

जी दारूची बाटली १५० रुपयांना होती, तीच रविवारी २५० रुपयांना दिली जात होती. जो मुलगा घेऊन येतो, तो आणखी बाटली दिली म्हणून १० रुपयांची ‘टिप’ही घेत होता. यावरून जादा दराने सर्वत्रच दारू विक्री केली जात असल्याचे उघड झाले आहे.

चकण्याला काकडी अन् कैरी

ज्या हॉटेलमध्ये बसून दारू ढोसली जात आहे, तेथेच चकण्याची व्यवस्थाही केली जात आहे. ग्राहक स्वत:हून चकण्याची व्यवस्था करीत असल्याचे दिसले. काहींनी काकडी तर काहींनी कैरीची व्यवस्था केली. दारू ढोसल्यानंतर नॉनव्हेजच्या जेवणावर ताव मारून हे मद्यपी शहराच्या दिशेने रवाना होत आहेत. पोलिसांना चुकवून ते येत होते. त्यांना काेणी हटकतही नाही. विचारल्यावर आपल्याला कोणीच हटकले नाही, असे अभिमानाने सांगत होते. परंतु त्यांच्या गलथानपणामुळे कुटुंबातील इतर सदस्यांना कोरोनाचा धोका पोहोचण्याची दाट शक्यता आहे, याचा त्यांना विसर पडत आहे.

वीकेंड लॉकडाऊनच्या दोन दिवसांत सर्वच आस्थापना बंद ठेवण्यास सांगितलेल्या आहेत. दारू विक्रीस पूर्णत: बंदी आहे. अशी कोठे विक्री होत असेल तर चौकशी करून कारवाई केली जाईल.

नितीन धार्मिक, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क बीड

एकाही हॉटेलमध्ये बसून जेवणास परवानगी नाही. केवळ पार्सल सुविधांना परवानगी आहे.

ऋषिकेश मरेवार, अन्न निरीक्षक बीड

===Photopath===

110421\11_2_bed_13_11042021_14.jpg

===Caption===

एका हॉटेलमध्ये ढेकळात लपविलेली दारूची बाटली टेबलवर आली. त्यानंतर कैरी अन् काकडीच्या सोबतिने तिचा मद्यपींनी अस्वाद घेतला.

Web Title: As soon as the money is thrown, the liquor in the lump comes to the table

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.