हसतमुख चेहरा क्षणात हरपला! पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा मॉर्निंग वॉक करताना हृदयविकाराने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 15:04 IST2025-11-20T15:04:20+5:302025-11-20T15:04:55+5:30
माजलगावमध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे निधन; हसतमुख व्यक्तीच्या अचानक जाण्याने शहर हादरले

हसतमुख चेहरा क्षणात हरपला! पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा मॉर्निंग वॉक करताना हृदयविकाराने मृत्यू
माजलगाव ( बीड) : आयुष्यात फिटनेस, आरोग्य आणि कलेला महत्त्व देणाऱ्या एका हसतमुख व्यक्तीचे गुरुवारी पहाटे अत्यंत दुर्दैवी निधन झाले आहे. माजलगाव शहरावर आज पहाटे एकच शोककळा पसरली. दररोजच्या नित्यनेमाप्रमाणे मॉर्निंग वॉकनंतर व्यायाम करत असतानाच डॉ. चंद्रशेखर उजगरे (वय ५३) यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते जागेवरच कोसळले. वडवणी तालुक्याचे पशुधन वैद्यकीय अधिकारी असलेले डॉ. उजगरे यांच्या निधनामुळे संपूर्ण शहर हादरले आहे.
डॉ. चंद्रशेखर उजगरे हे केवळ पशुवैद्यकीय अधिकारी नव्हते, तर एक उत्तम सिंगर, उत्कृष्ट फुटबॉल खेळाडू आणि नेहमीच हसतमुख व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. नियमित व्यायाम करणे हा त्यांचा नित्यनेम होता. नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास डॉ. चंद्रशेखर हे येथील सोळंके महाविद्यालयातील ट्रॅकवर वॉकिंग पूर्ण करून व्यायाम करत होते. याच वेळी अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते कोसळले. त्यांच्यासोबत वॉकसाठी आलेल्या नागरिकांनी त्यांना तातडीने माऊली हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत त्यांनी जगाचा निरोप घेतला होता. ज्या व्यक्तीने आयुष्यभर फिटनेस, व्यायाम आणि आरोग्याला प्राधान्य दिले, त्या व्यक्तीचा इतक्या अचानकपणे जाणे, यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता.
कुटुंबावर दुःखाचा अकल्पित डोंगर
डॉ. उजगरे यांच्या अकस्मात निधनाची वार्ता शहरभर पसरताच माऊली हॉस्पिटलकडे शेकडो नागरिकांनी धाव घेतली. जिल्हा परिषद हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक ज्ञानोबा उजगरे सरांचे चिरंजीव असलेले डॉ. चंद्रशेखर हे कुटुंबाचे प्रमुख आधारस्तंभ होते. वडिलांच्या निधनानंतर आई लीला ताई यांच्यावर आलेले मानसिक ओझे अजूनही कमी झाले नव्हते. आणि आता तरुण, कर्तबगार, सर्वांचा लाडका मुलगा अशा पद्धतीने अचानक निघून जाणे हा आईसह पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, दोन बहिणी अशा संपूर्ण कुटुंबासाठी असह्य आघात आहे.