गैरहजर असतानाही स्वाक्षरी केल्या, विस्तार अधिकारी निलंबित
By शिरीष शिंदे | Updated: June 11, 2024 19:01 IST2024-06-11T18:55:28+5:302024-06-11T19:01:51+5:30
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केली कारवाई; अनधिकृतपणे गैरहजर राहणे, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे ही वर्तणूक नियमांचा भंग करणारी आहे.

गैरहजर असतानाही स्वाक्षरी केल्या, विस्तार अधिकारी निलंबित
बीड: पूर्णवेळ कार्यालयात न थांबणे, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे या प्रमुख कारणांवरुन केज पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी धनंजय दत्तात्रय निंबाळकर यांना निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांनी केली. विशेष म्हणजे गैरहजर असतानाही कोणाचीही पूर्व परवानगी न घेता निंबाळकर यांनी हजेरी पटावर स्वाक्षऱ्या केल्याचेही समोर आले होते.
केज पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी धनंजय निंबाळकर हे कार्यालयात अनधिकृतपणे गैरहजर राहत होते. त्यामुळे त्यांना या प्रकरणी नोटीस बजावून खुलासा मागविण्यात आला होता. तसेच १४ ऑगस्ट २०२३ पासून विनापरवानगी गैरहजर असताना कोणाचीही पूर्वपरवानगी न घेता हजेरी पटावर स्वाक्षऱ्या केल्या. दरम्यान, निंबाळकर हे रुजू झाल्यापासून कार्यालयात पूर्णवेळ थांबत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडील कृषीविषयक कामकाज प्रलंबित राहत आहेत. गैरहजेरीबाबत वरिष्ठांना खुलासाही सादर करत नाहीत. त्यामुळे निंबाळकर यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा परिषद कार्यालयास सादर करण्यात आला होता. याबाबत जिल्हा परिषदेकडून कारणे दाखवा नोटीस देऊन खुलासा विचारण्यात आला. मात्र, सदरील नोटीस घेण्यास निंबाळकर यांनी नकार दिला असल्याचा अहवाल केज पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांनी सादर केला.
वर्तणूक नियमांचा भंग
अनधिकृतपणे गैरहजर राहणे, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे ही वर्तणूक नियमांचा भंग करणारी आहे. त्यामुळे केज पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी धनंजय दत्तात्रय निंबाळकर यांना महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ मधील नियम ३ मधील तरतुदीनुसार जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांनी केली. निलंबन काळात आष्टी पंचायत समिती हे मुख्यालय देण्यात आले आहे. पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नसल्याचे आदेशात म्हटले आहे.