धक्कादायक ! तोंडात फटाका फुटल्याने युवक गंभीर जखमी; रेल्वेतील टॉयलेटमध्ये घडली घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 14:05 IST2019-12-23T14:00:31+5:302019-12-23T14:05:12+5:30
युवक आई व बहिणीसोबत हैद्राबादला प्रवास करत होता

धक्कादायक ! तोंडात फटाका फुटल्याने युवक गंभीर जखमी; रेल्वेतील टॉयलेटमध्ये घडली घटना
परळी : 'पूर्णा- परळी -हैदराबाद' रेल्वेच्या एका डब्यातील टॉयलेटमध्ये तोंडात फटाका फुटल्याने एक युवक गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (२३ ) सकाळी येथील रेल्वे स्थानकात घडली. सय्यद अक्रम (१९ ) असे जखमी युवकाचे नाव असून तो परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाथरी येथील सय्यद अक्रम हा आई व बहिणीसोबत हैद्राबादला जाण्याकरिता 'पूर्णा- परळी -हैदराबाद' रेल्वेतून प्रवास करत होता. रेल्वे परळी रेल्वे स्थानकात आली असता डब्यातील एका टॉयलेटमधून अचानक मोठा आवाज आला. प्रवाशांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली असता सय्यद अक्रम गंभीररीत्या जखमी अवस्थेत तिथे आढळून आला. त्याचे हात भाजलेले होते व तोंडाला गंभीर जखम झाली होती. त्याला लागलीच परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस घटनास्थळी आले असून अधिक तपास सुरु आहे. दरम्यान, त्याने स्वतः हून तोंडात फटाका फोडल्याची चर्चा प्रवासी करत होते.