धक्कादायक ! संचारबंदी काळात दुकान उघडले; बंद करण्यास सांगणाऱ्या पोलिसांवर जमावाचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 17:10 IST2020-05-09T17:05:47+5:302020-05-09T17:10:05+5:30
ऐनवेळी इतर ग्रामस्थांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला.

धक्कादायक ! संचारबंदी काळात दुकान उघडले; बंद करण्यास सांगणाऱ्या पोलिसांवर जमावाचा हल्ला
दिंद्रुड ( बीड ) : संचारबंदी काळात दुकान सुरु ठेवल्याचा जाब विचारणाऱ्या पोलिसांवर जमावाने हल्ला चढवत जबर जखमी केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलिस स्थानकाच्या हद्दीत घडलेल्या या घटनेत ऐनवेळी इतर ग्रामस्थांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला.
अधिक वृत्त असे की, दिंद्रुड पोलिस हद्दीतील नाकलगाव येथे मटनाचे दुकान संचारबंदी काळातही सुरु असल्याचे आढळून आले. यामुळे पोलीस कर्मचारी विशाल मुजमुले व आकाश जाधव यांनी दुकानदारास जाब विचारत दुकान बंद करण्यास सांगितले. मात्र, या दरम्यान पोलिसांनी मारहाण केल्याचा राग धरून दुकानदाराने वीस ते पंचविस जणांचा जमाव जमवत दोन्ही पोलिसांवर हल्ला चढवला. यावेळी आरडाओरडा ऐकल्याने काही ग्रामस्थ त्या दिशेने धावली. त्यांनी लागलीच मध्यस्थी करत पोलीस कर्मचाऱ्यांना बाजूला घेतले यामुळे पुढील अनर्थ टळला.
हल्ल्यात पोलिस कर्मचारी विशाल मुजमुले यांच्या कानातून तर आकाश जाधव यांच्या डोळ्यातून रक्तस्राव होत असल्याने त्यांना बीड येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिंद्रुड पोलिस स्टेशनला भेट दिली. अप्पर पोलिस अधिक्षक स्वाती भोर, पोलिस उपअधीक्षक श्रीकांत ढिसले यांनी शनिवारी घटनास्थळी भेट दिली आहे.दिंद्रुड पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.