धक्कादायक! जमिनीच्या वादातून महिलेचा खून; तीन महिन्यानंतर शेतात आढळला पुरलेला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2022 17:07 IST2022-03-03T17:07:00+5:302022-03-03T17:07:23+5:30
गावातील तिघे जमीन नावावर करून दे, अन्यथा जीवे मारू अशी धमकी देत

धक्कादायक! जमिनीच्या वादातून महिलेचा खून; तीन महिन्यानंतर शेतात आढळला पुरलेला मृतदेह
कडा (बीड) : जमिनी आमच्या नावावर करून दे, असे म्हणत एका ४२ वर्षीय महिलेचा खून करून मृतदेह तिच्याच शेतात पुरल्याचे तब्बल तीन महिन्यानंतर बुधवारी ( दि. २) उघडकीस आले. मंदा हरिभाऊ गायकवाड असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
मंदा हरिभाऊ गायकवाड या बीड-कडा नगर राष्ट्रीय महामार्गावर वटणवाडी येथील रहिवासी आहेत. १६ वर्षांपूर्वी त्यांचा पती बेपत्ता झाला. त्यांना मुलबाळ नसून केवळ अंध सासू आहेत. हतबल असल्याची संधी साधत भरत गायकवाड, प्रल्हाद घुमरे, सुनिल गांगर्डॅ हे तिघे मंदा यांना जमीन आमच्या नावावर करून दे, अन्यथा जीवे मारू, असे म्हणत दबाव आणत. मात्र, मंदा यांनी त्यास सपशेल नकार दिला. यानंतर ३ नोव्हेंबर २०२१ रोजी शेतात गेलेल्या मंदा या परतल्या नव्हत्या. यामुळे त्यांच्या भावाने पोलिसात संशयितांची नावे देऊन फिर्याद दिली.
दरम्यान, बुधवारी ( दि. २ ) मंदा यांच्या शेतात कुत्र्यांनी जमिनीत पुरलेले एक प्रेत बाहेर काढले होते. हे काही शेतकऱ्यांचा लक्षात आले. त्यांनी लागलीच पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी शेतात धाव घेऊन मृतदेहाची ओळख पटवली. मृतदेह मंदा गायकवाड यांचा असल्याचे स्पष्ट झाले. मंदा यांच्या भावाच्या फिर्यादीवरून भरत गायकवाड, प्रल्हाद घुमरे, सुनिल गांगर्डॅ यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आष्टी पोलिसांनी तिन्ही आरोपींना बुधवारी रात्री मोठ्या शिताफीने अटक केली. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर, पोलीस निरीक्षक सलिम चाऊस, पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांनी पाहणी केली.