खळबळजनक ! ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेचा खून करून मृतदेह शेतात पुरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 19:57 IST2019-05-20T19:53:01+5:302019-05-20T19:57:46+5:30

पैसे नाही दिल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी महिला देत असे

shocking ! The blackmailer women killed and buried the body in the field of Osmanabad | खळबळजनक ! ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेचा खून करून मृतदेह शेतात पुरला

खळबळजनक ! ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेचा खून करून मृतदेह शेतात पुरला

ठळक मुद्देसततच्या धमक्यांमुळे संतापल्याने खुनाचा रचला कटभाऊजीकडून पैसे घेऊन देतो असे सांगून शिरढोणला नेले

अंबाजोगाई (बीड ) : बलात्काराची तक्रार देण्याची धमकी देऊन सातत्याने पैसे मागणाऱ्या अंबाजोगाई तालुक्यातील नांदगाव तांडा येथील एका महिलेचा खून करण्यात आला. यानंतर तिचा मृतदेह उस्मानाबाद जिल्ह्यातील शिराढोण येथे पुरल्याची चित्रपटास शोभेल अशी घटना उघडकीस आली आहे.

कविता कुंडलिक चव्हाण (वय २२, रा. नांदगाव तांडा, ता. अंबाजोगाई) असे त्या महिलेचे नाव आहे. तिच्या गावातील मोहन भीमराव राठोड याला ती सारखे पैसे मागत असे. पैसे नाही दिल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी तिने मोहनला दिली. सततच्या धमक्यांमुळे संतापलेल्या मोहनने पांडुरंग रावसाहेब पवार (रा. शिराढोन तांडा, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) याच्या मदतीने कविताच्या खुनाचा कट रचला. 

मोहनने भाऊजीकडून १० हजार रूपये घेऊन देतो असे आश्वासन कविताला दिले. यानंतर १२ मे रोजी सायंकाळी ७ वाजता मोहन कविताला दुचाकीवरून (एमएच ४४ व्हि १५९४) उस्मानाबाद जिल्ह्यातील शिराढोणला घेऊन गेला. तिथे गोराज नावाच्या शेतात रात्री उशीरा मोहनने नायलाॅन दोरीच्या साह्याने गळा आवळून कविताचा खून केला. त्यानंतर मध्यरात्रीतून पांडुरंगच्या मदतीने तिचा मृतदेह पोत्यात घालून खड्ड्यात पुरला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संदिप यादव यांच्या फिर्यादीवरून मोहन राठोड आणि पांडुरंग पवार या दोघांवर बर्दापूर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास सहा. पोलीस निरिक्षक लक्ष्मण केंद्रे करत आहेत.

बेपत्ता झाल्याची नातेवाईकांची तक्रार 
कविता बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी १२ मे रोजी बर्दापूर ठाण्यात दिली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना फौजदार यादव यांना त्यात काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय आला. त्यांनी संतोषला ताब्यात घेऊन पोलीसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची इत्यंभूत माहिती दिली.

पोलीस पथक शिराढोणला रवाना :
पोलीसांनी आरोपी मोहन राठोडला बेड्या ठोकल्या असून कविताचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आणि दुसरा आरोपी पांडुरंगचा शोध घेण्यासाठी बर्दापूर पोलीसांचे पथक शिराढोणकडे रवाना झाले आहे. त्यानंतर या प्रकरणातील अनेक गोष्टींचा उलगडा होऊ शकणार आहे.

Web Title: shocking ! The blackmailer women killed and buried the body in the field of Osmanabad