आमदार प्रकाश सोळंकेंना धक्का; रत्नसुंदर मेमोरियल हॉस्पिटलचा परवाना कायमस्वरूपी रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 07:33 PM2023-12-01T19:33:56+5:302023-12-01T19:35:39+5:30

इमारत अपूर्ण असतानाही हॉस्पिटलच्या नावाने घेतला होता १०० बेडचा परवाना

Shock to MLA Prakash Solanka; License of Ratnasundar Memorial Hospital permanently cancelled | आमदार प्रकाश सोळंकेंना धक्का; रत्नसुंदर मेमोरियल हॉस्पिटलचा परवाना कायमस्वरूपी रद्द

आमदार प्रकाश सोळंकेंना धक्का; रत्नसुंदर मेमोरियल हॉस्पिटलचा परवाना कायमस्वरूपी रद्द

माजलगाव ( बीड) : येथील आ.प्रकाश सोळंके यांच्या पत्नी अध्यक्ष असलेल्या माजलगाव विकास प्रतिष्ठाण, पुणे च्या मार्फत माजलगाव शहरातील बायपास रोडवरील रत्नसुंदर मेमोरियल हॉस्पिटलचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक बडे यांनी आज दिले. इमारत अपूर्ण असतानाही  हॉस्पिटलसाठी १०० बेडचा परवाना देण्यात आल्याच्या तक्रारीत तथ्य आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली. 

माजलगाव येथील आ. सोळंके यांच्या पत्नी मंगलबाई सोळंके अध्यक्ष असलेल्या माजलगाव विकास प्रतिष्ठानच्या मार्फत माजलगाव शहरातील सर्वे नंबर ३७२ या वादग्रस्त जागेत रत्नसुंदर मेमोरियल हॉस्पिटलची उभारणी करण्यासाठी इमारत बांधकाम केले. इमारतीचे बांधकामही वादग्रस्त ठरले होते. दरम्यान, या हॉस्पिटलच्या इमारतीला माजलगाव नगरपालिकेचा बांधकाम परवाना ६/१/२०२३ रोजीचा आहे. तर या ठिकाणी १०० बेडचे हॉस्पिटल सुरू असल्याचे बीड जिल्हा रुग्णालयातून बॉम्बे नर्सिंग अॅक्टनुसार दि.२१ जुन २०२१ रोजी परवाना देण्यात आल्याचे निदर्शनास आले. वास्तविक पाहता इमारतीचे बांधकाम अपूर्ण आहे. 

याबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष नाकलगावकर यांनी दि.२० ऑक्टोबर २०२३ रोजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक बडे आणि बीडचे जिल्हाधिकारी यांच्याकडे सर्व पुराव्यानिशी तक्रार केली. या तक्रारीच्या अनुषंगाने माजलगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांच्यामार्फत चौकशी करण्यात आली. यावेळी तक्रारीत तथ्य आढळून आले. यावरून शल्यचिकित्सक डॉ. बडे यांनी आज रत्नसुंदर हॉस्पिटल कायमस्वरूपी बंद करण्याचे आदेश दिले. तसेच बॉम्बे नर्सिंग अॅक्ट खाली दिलेले प्रमाणपत्र जिल्हा रुग्णालयात जमा करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. महत्वाकांक्षी हॉस्पिटल प्रकल्पाचा परवाना कायमस्वरूपी रद्द झाल्याची कारवाई आ. सोळंके यांना मोठा धक्का मानली जात आहे.

Web Title: Shock to MLA Prakash Solanka; License of Ratnasundar Memorial Hospital permanently cancelled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.