चाक फुटल्याने शिवशाही बस उभ्या बैलगाडीवर आदळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 23:40 IST2019-11-07T23:40:31+5:302019-11-07T23:40:59+5:30
परळीहून प्रवाशी घेवून पुण्याकडे निघालेल्या शिवशाही बसचे अचानक टायर फुटले अन् ती बस रस्त्यालगत उभ्या असणाऱ्या बैलगाडीवर आदळली.

चाक फुटल्याने शिवशाही बस उभ्या बैलगाडीवर आदळली
बीड : परळीहून प्रवाशी घेवून पुण्याकडे निघालेल्या शिवशाही बसचे अचानक टायर फुटले अन् ती बस रस्त्यालगत उभ्या असणाऱ्या बैलगाडीवर आदळली. या अपघातात बैलगाडीचे मोठे नुकसान झाले. यात बसमधील कोणीही प्रवासी जखमी झाले नाहीत. ही घटना बीड-पाटोदा रस्त्यावरील लिंबागणेश नजीक ७ नोव्हेंबर रोजी सकाळी घडली. माहिती मिळताच एस.टी.महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले.
राज्य परिवहन महामंडळाने करार तत्वावर शिवशाही बस प्रवाशांच्या सेवेसाठी राज्यभरात सुरु केलेल्या आहेत. मात्र, प्रवास करताना अनेकदा या बस बंद पडण्याचे प्रकार घडलेले आहेत. असे असतानाच गुरुवारी लिंबागणेशजवळ शिवशाही बसचे टायर फुटले. परळी येथून पुण्याकडे निघालेली बस (एम.एच.१४/२४६०) ही मांजरसुंब्याहून पुढे लिंबागणेशकडे धावत असतांना अचानक बसचे समोरील टायर फुटले. हा प्रकार चालकाच्या लक्षात येताच त्याने बस रस्त्याच्या बाजूला घेण्याचा प्रयत्न केला.
सध्या मांजरसुंबा ते पाटोदा या चारपदरी सिमेंट रस्त्याचे काम सुरु आहे. बस बाजूला घेतांना रस्त्यालगत उभ्या बैलगाडीवर जावून ती आदळली. यात बैलगाडी अक्षरश: खिळखिळी झाली. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. सुदैवाने यात बसमधील एकही प्रवाशी जखमी झाला नाही. इतर बसने प्रवाशांना पुढील प्रवासासाठी बसवून देण्यात आले.