शिवसंग्रामचा राज्यभर भाजपला 'सपोर्ट'; बीड जिल्ह्यात मात्र 'विरोध'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 14:36 IST2019-03-16T14:35:41+5:302019-03-16T14:36:17+5:30
बीड जिल्ह्यात मात्र आम्ही भाजपचे काम करणार नाही, असा स्पष्ट इशारा आ. विनायक मेटे यांनी दिला.

शिवसंग्रामचा राज्यभर भाजपला 'सपोर्ट'; बीड जिल्ह्यात मात्र 'विरोध'
बीड : लोकसभा निवडणुकीत राज्यात शिवसंग्राम ही भाजपासोबत काम करील; परंतु बीड जिल्ह्यात मात्र आम्ही भाजपचे काम करणार नाही, असा स्पष्ट इशारा आ. विनायक मेटे यांनी शुक्रवारी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना दिला.
पदाधिकाऱ्यांचे मत जाणून घेण्यासाठी बीड येथे दुपारी बैठक झाली. यात भाजपच्या वागणुकीबद्दल पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. बीड जिल्ह्यात शिवसंग्रामच्या वाट्याला भाजपाकडून अपमानच आला आहे. म्हणून स्वाभिमानासाठी शिवसंग्रामने भाजपासोबत काम करू नये, असा बैठकीचा सूर होता. मेटे म्हणाले की, शिवसंग्रामला ठरल्याप्रमाणे भाजपने काही दिले नसले तरी शेवटच्या टप्प्यात महामंडळाच्या रूपाने सत्तेत वाटा दिला. मला मंत्रीपद मिळाले नाही तरी माझ्या कार्यकर्त्यांचा सन्मान केला. मुख्यमंत्र्यांची शिवसंग्रामबाबतची भूमिका नेहमीच सहकार्याची राहिली आहे; परंतु जिल्ह्यात मात्र भाजपकडून अपमानच सहन करावा लागला.
बीडमध्ये आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न
पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सातत्याने आमच्याबद्दल शंका घेत सूडाचे राजकारण केले. एक दमडीही विकासकामासाठी दिली नाही. दुष्काळी परिस्थिती असतानाही सर्वप्रथम छावण्यांचे प्रस्ताव आम्ही दिले होते; परंतु राजकारण करून त्यांनी संमती दिली नाही. शिवसंग्रामला सोबत घेऊन जाण्याऐवजी आमच्यातच फूट पाडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बीड लोकसभा निवडणुकीत आम्ही जिल्ह्यात भाजपचे काम करणार नाही; परंतु राज्यात मात्र युतीचे उमेदवार निवडून यावेत यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.