वाह रे गुरूजी; सेल्फी काढायचा म्हणत गर्भवतीला मारली मिठी

By सोमनाथ खताळ | Updated: July 16, 2024 19:36 IST2024-07-16T19:35:47+5:302024-07-16T19:36:26+5:30

माहेरी आलेल्या पीडितेच्या घरी जाऊन शिक्षकाचा प्रताप

Shame on teacher; He hugged the pregnant woman saying to take a selfie | वाह रे गुरूजी; सेल्फी काढायचा म्हणत गर्भवतीला मारली मिठी

वाह रे गुरूजी; सेल्फी काढायचा म्हणत गर्भवतीला मारली मिठी

बीड : तू माझ्या जवळ ये. तुझ्यासोबत सेल्फी काढायचा आहे असे म्हणत माहेरी आलेल्या गर्भवतीला शिक्षकाने मिठी मारली. हा प्रकार १४ जूलै रोजी गेवराई तालुक्यातील एका गावात घडला. याप्रकरणी शिक्षकाविरोधात तलवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शिक्षकाच्या कृत्यामुळे खळबळ उडाली आहे.

गेवराई तालुक्यातील २१ वर्षिय विवाहिता ही गर्भवती असल्याने माहेरी आली होती. याचवेळी याच तालुक्यातील एक शिक्षक १४ जूलै रोजी दुपारी तीन वाजता पीडितेच्या घरी गेला. त्याला चहा पाणीही करण्यात आले. तू सध्या शिक्षण चालू ठेवले आहे की बंद? अशी विचारणा शिक्षकाने पीडितेला केल्यावर शिक्षण बंद असल्याचे तिने सांगितले. त्यानंतर माहेरी का आली, असे विचारल्यावर गर्भवती असल्याने आराम करण्यासाठी आल्याचे तिने सांगितले. त्यानंतर शिक्षकाने दार बंद केले आणि तू माझ्याजवळ बस. मला तुझ्यासोबत फोटो काढायचे आहेत असे म्हणून तिला जवळ घेतले.

यावर पीडिता ओरडली. हा आवाज ऐकून गावातीलच दोघे मदतीला धावले आणि त्यांनी पीडितेची सुटका केली. त्यानंतर शिक्षकाने तेथून धूम ठोकली. हा प्रकार पीडितेने पती घरी आल्यावर सांगितला. त्यानंतर पीडितेच्या फिर्यादीवरून शिक्षकाविरोधात तलवाडा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Shame on teacher; He hugged the pregnant woman saying to take a selfie