सावळा गोंधळ; आस्थापनेवर मायबाप अन् कामावर मुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:27 IST2021-02-05T08:27:16+5:302021-02-05T08:27:16+5:30
लोकमत एक्सक्लुझिव्ह सोमनाथ खताळ बीड : जिल्हा रुग्णालयात दिवसेंदिवस नवनवीन प्रकार चव्हाट्यावर येत आहेत. अधिकाऱ्यांच्या ‘अर्थ’पूर्ण सहकार्याचा शुक्रवारी ‘लोकमत’ने ...

सावळा गोंधळ; आस्थापनेवर मायबाप अन् कामावर मुले
लोकमत एक्सक्लुझिव्ह
सोमनाथ खताळ
बीड : जिल्हा रुग्णालयात दिवसेंदिवस नवनवीन प्रकार चव्हाट्यावर येत आहेत. अधिकाऱ्यांच्या ‘अर्थ’पूर्ण सहकार्याचा शुक्रवारी ‘लोकमत’ने पर्दाफाश केला. वर्ग-४ च्या आस्थापनेवर मायबापांचे नाव असून प्रत्यक्ष वाॅर्डमध्ये त्यांची मुले व इतर नातेवाईक असल्याचे समोर आले आहे. या प्रकाराने सावळागोंधळ चव्हाट्यावर आला आहे. आता यात कोणाचे उखळ पांढरे झाले, हे चौकशीतून समोर येणार आहे.
जिल्हा रुग्णालयात वर्ग-४ चे १७९ कर्मचारी कर्तव्यावर आहेत. त्यातील ८१ स्थलांतरित जिल्हा रुग्णालयात, ८२ कार्यालय व जुन्या जिल्हा रुग्णालयात आणि १६ कर्मचारी हे कोरोना वॉर्डमध्ये काम करतात. या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन मुकादमांची नियुक्ती केलेली आहे तसेच या कर्मचाऱ्यांच्या मनाप्रमाणे ड्युटी लावण्याचे ‘नियोजन’ अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांच्या सांगण्यावरून होते तसेच जिल्हा रुग्णालयाचे पूर्ण नियोजन करण्याची जबाबदारीही त्यांचीच आहे. परंतु ढिसाळ नियोजनामुळे सध्या कारभार ढेपाळला आहे. दोन महिला व दोन पुरुष असे चार कर्मचारी कधीच रुग्णालयाकडे फिरकत नाहीत. ते आजारी असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु त्यांनी वैद्यकीय रजा घेण्याऐवजी मुले, नातेवाईक कामावर पाठविले आहेत. त्यांना कसलेही प्रशिक्षण अथवा माहिती नसल्याने चुका होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. केवळ नियंत्रण नसल्याने आणि ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्षामुळेच सध्या जिल्हा रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
यात बळी कोणाचा जाणार?
कोणत्याही प्रकरणात वरिष्ठांची चूक असली तरी कनिष्ठांचा बळी दिला जातो. त्यात कर्मचाऱ्यांवर तर कारवाई होईलच, परंतु सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या प्रकाराबद्दल अधिकारी कसे काय अनभिज्ञ, असाही सवाल उपस्थित होत आहे. आता यात अधिकाऱ्यांनाही दोष देणार की, कर्मचाऱ्यांचाच नेहमीप्रमाणे बळी देणार, असा सवाल उपस्थित होत आहे. चौकशी पथकावरही बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असणार आहेत.
एसीएस अनभिज्ञ, म्हणाले माहिती घेऊन सांगतो
अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांच्याकडे संपूर्ण नियोजन आहे. परंतु त्यांचे दुर्लक्ष असल्याने रुग्णालयात काय चालले, हेदेखील त्यांना माहिती नाही. साधारण सहा महिन्यांपासून असा प्रकार होत असतानाही त्यांनी ‘बघावे लागेल, माहिती घेऊन सांगतो’ असे नेहमीप्रमाणे उत्तर दिले.
कोट
हे प्रकरण कानावर आले आहे. याची चौकशी लावली आहे. अहवाल आल्यावर सांगू.
- डॉ. सूर्यकांत गित्ते,
जिल्हा शल्यचिकित्सक, बीड