महावितरणची 'शिट्टी' फुटल्याने सत्तर गावे अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:24 IST2021-07-18T04:24:30+5:302021-07-18T04:24:30+5:30
संजय कातकडे उजनी : अंबाजोगाई व परळी तालुक्यांतील जवळपास सत्तर गावांचा वीजपुरवठा शुक्रवारी दुपारी बारा वाजता खंडित झाला. परळीतील ...

महावितरणची 'शिट्टी' फुटल्याने सत्तर गावे अंधारात
संजय कातकडे
उजनी : अंबाजोगाई व परळी तालुक्यांतील जवळपास सत्तर गावांचा वीजपुरवठा शुक्रवारी दुपारी बारा वाजता खंडित झाला. परळीतील जीसीआर येथील शिट्टी फुटल्याने वीज खंडित होऊन शनिवारी दुपारी अडीच वाजेपर्यंत सव्वीस तासांहून अधिक काळ वीजपुरवठा बंदच होता.
अंबाजोगाई तालुक्यातील उजनी, पट्टीवडगाव व परळी तालुक्यांतील धर्मापुरी व सारडगाव या चार ३३ केव्ही उपकेंद्रातून दोन तालुक्यांतील जवळपास सत्तर गावांना वीज वितरित होते. या चारही वीज उपकेंद्रांना परळी येथील जुने थर्मल येथील जीसीआर वीज केंद्रातून वीजपुरवठा होतो. येथील केंद्रातून वरील चार उपकेंद्रांना पुरवठा होणाऱ्या ३३ केव्ही वीज वितरण वाहिनीला 'अहमदपूर फिडर' या नावाने ओळखले जाते. शुक्रवारी दुपारी बारा वाजता अहमदपूर फिडरची 'शिट्टी' फुटल्यामुळे सत्तर गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.
एक-दोन तासात होऊ शकणाऱ्या कामाला सव्वीस तास उशीर लागल्याने सत्तर गावांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला. अंबाजोगाई विभागाचे कार्यकारी अभियंता, परळी व अंबाजोगाई येथील दोन उपकार्यकारी अभियंता व तीन कनिष्ठ अभियंता आणि जवळपास पन्नास कर्मचाऱ्यांचा ताफा या 'अहमदपूर फिडर' वरील गावांच्या सेवेकरिता आहे. तरी देखील क्षुल्लक कारणामुळे या सत्तर गावांचा वीजपुरवठा दोन-दोन दिवस बंद राहत असल्यामुळे या भागातील जनतेमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
'डिव्हिजन'कडून पाठविलेल्या दोन्ही शिट्टया फेल
दरम्यान, काल महावितरणच्या अंबाजोगाई विभाग कार्यालयाने दोन शिट्टया पाठविल्या होत्या. मात्र, त्या दोन्ही शिट्टया 'फेल' निघाल्या. दोन्ही शिट्टया बसवून परत काढाव्या लागल्याचे समजते. शेवटी आज लातूरहून शिट्टी मागवून वीजपुरवठा चालू केला आहे.
काल परळी येथील १३२ केव्ही वीजकेंद्रातून ३३केव्ही उपकेंद्रांना वीजपुरवठा होणारी शिट्टी फुटल्याने कालपासून वीजपुरवठा बंद होता. शिट्टी बसविण्यास वेळ लागल्याने वीजपुरवठा सुरळीत होण्यास विलंब लागला.
- सचिन बागेश्वर, कनिष्ठ अभियंता, उजनी उपकेंद्र.
क्षुल्लक कारणावरून या भागातील वीज दोन-दोन दिवस खंडित झाली असून ग्रामीण भाग असल्याने वरिष्ठ अधिकारी या बाबीला गांभीर्याने घेत नाहीत. भविष्यात अशी दीर्घकाळ वीज खंडित झाल्यास महावितरण विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल.
दिलीप मुंडे, भाजप नेते उजनी.
या भागातील वीजपुरवठा दोन-दोन दिवस बंद पडण्याचे प्रकार नेहमी होत आहेत. त्यामुळे धर्मापुरी येथील मरळशिद परिसरातील वीस वर्षांपूर्वी सर्वेक्षण झालेल्या नवीन १३२ केव्ही वीज केंद्राचे काम लवकर करून या भागातील विजेचा प्रश्न सोडवावा.
-विठ्ठलराव भताने, सरपंच भतनवाडी.