बीड जिल्ह्यात आतापर्यंत एकाही व्यक्तीचा कोरोना अहवाल दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:34 IST2021-02-24T04:34:43+5:302021-02-24T04:34:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : एकदा कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर त्याच्या शरिरात ॲंटीबॉडीज तयार होतात, असे आरोग्य विभागाकडून सांगितले ...

बीड जिल्ह्यात आतापर्यंत एकाही व्यक्तीचा कोरोना अहवाल दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : एकदा कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर त्याच्या शरिरात ॲंटीबॉडीज तयार होतात, असे आरोग्य विभागाकडून सांगितले जात आहे. तरीही वृद्धांसह इतरांना कोरोनामुक्त झाल्यावरही लक्षणे जाणवली आहेत; परंतु अशा एकाही व्यक्तीने दुसऱ्यांदा चाचणी केली नाही. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकदा बाधा झालेल्या रुग्णाला दुसऱ्यांदा कोरोनाची बाधा झाली नसल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या मागील आठवड्यापासून वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून चाचण्या वाढविण्यासह काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. बाधितांवर रुग्णालय, कोविड केअर सेंटरमध्ये उपचार केले जात आहेत; परंतु ज्यांना कोरोनामुक्त झाल्यानंतरही लक्षणे आहेत, अशांसाठी पोस्ट कोविड उघडण्यात आली आहे.
लक्षणे असतानाही चाचणी नाही
एकदा कोरोना पॉझिटिव्ह येऊन कोरोनामुक्त झाल्यानंतरही अनेकांना पोस्ट कोविड लक्षणे जाणवतात; परंतु पहिल्याच वेळेस १० दिवस रुग्णालयात उपचार घेतले आणि भीतीपोटी अनेकांनी लक्षणे असतानाही दुसऱ्यांदा चाचणी करण्यास धाडस केले नसल्याचे सांगण्यात येत आहे.
मास्क, सोशल डिस्टन्सिंग हाच उपाय
व्यापारी, उद्योजक, सामान्य नागरिकांनी २०२० हे वर्ष लॉकडाऊनमुळे घरात बसून घालवले. त्यामुळे नागरिक वैतागले आहेत. शिवाय अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता पुन्हा लॉकडाऊन नको, असे म्हणत प्रत्येकाने स्वत:ची व कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन नागरिकच करीत आहेत. प्रशासनाकडूनही कोरोना नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे. लॉकडाऊन टाळण्यासह कोरोनापासून बचावासाठी मास्क, सोशल डिस्टन्स ठेवणे हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याची गरज आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकाही व्यक्तिचा कोरोना अहवाल दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह आला नाही. तसे झाल्यास तत्काळ आयसीएमआरच्या पोर्टलवर दाखविले जाते. नियंत्रण कक्षातून नियमित आढावा घेतात.
डॉ.राधाकिशन पवार
जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड.