‘खोक्या’ला अखेर बेड्या; उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने बीड पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 08:11 IST2025-03-13T08:11:31+5:302025-03-13T08:11:39+5:30

ट्रॅव्हल्सने गाठले प्रयागराज

Satish Bhosale arrested Beed Police takes action with the help of Uttar Pradesh Polic | ‘खोक्या’ला अखेर बेड्या; उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने बीड पोलिसांची कारवाई

‘खोक्या’ला अखेर बेड्या; उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने बीड पोलिसांची कारवाई

बीड : भाजपचे आ. सुरेश धस यांचा कार्यकर्ता कुख्यात आरोपी सतीश ऊर्फ खोक्या निराळ्या भोसले याच्याविरोधात चार गंभीर गुन्हे दाखल होते. तो सहा दिवसांपासून फरार होता. छत्रपती संभाजीनगरहून तो ट्रॅव्हल्सने प्रयागराजला (उत्तर प्रदेश) गेला. तेथे लपण्याआधीच बीड पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने त्याला बेड्या ठोकल्या. शुक्रवारी सकाळी त्याला बंदोबस्तात बीडला आणले जाणार आहे.
 
बुलढाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीला शिरूरकासार तालुक्यातील बावी येथे आणून पाच ते सहा जणांनी अर्धनग्न करून बॅटने मारहाण केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी दिलीप ढाकणे व महेश ढाकणे या बाप-लेकाला मारहाण केल्याचाही व्हिडीओ व्हायरल झाला. 

याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले. त्यानंतर वन विभागाने खोक्याच्या घरी छापा टाकून तपासणी केली. यात वाळलेले मांस आणि शिकारीचे साहित्य जप्त केले. 

या सर्व गुन्ह्यांमध्ये खोक्या हा पोलिसांना हवा होता; परंतु तो पोलिसांना सापडत नव्हता. अखेर या खोक्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे.

पुणे, अहिल्यानगरमध्ये मुक्काम घटनेचा व्हिडीओ खोक्याने सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यानंतर  त्याने अहिल्यानगर गाठले. तेथून पुणे आणि मग छत्रपती संभाजीनगरला आला. मंगळवारी दुपारी १२ वाजता खोक्या ट्रॅव्हल्सने प्रयागराजला गेला. तेथे उतरून लपण्याच्या तयारीत असतानाच यूपी पोलिसांनी त्याला पकडले. 

तेथे थांबण्याची तयारी 

गळ्यात सोने, पैशाची उधळण, व्हीआयपी वाहने, हेलिकॉप्टरमधून फिरतानाचे खोक्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते; परंतु गुन्हा दाखल होताच खोक्याने सोने काढले. प्रयागराजला पोहोचला. सोबत पाठीवर एक पिशवी होती. आठवडाभर तेथेच थांबण्याची तयारी त्याची होती.

जामिनासाठी अर्ज 

खोक्याने १० मार्च रोजी अटकपूर्व जामिनासाठी बीडच्या न्यायालयात अर्ज केला होता. त्याची सुनावणी बुधवारी होणार होती; परंतु मागावरील बीड पोलिसांनी त्याआधीच बेड्या ठोकल्या. 

खोक्या भोसले हा प्रयागराजमध्ये असल्याचे समजले. बीड आणि प्रयागराज पोलिस यांनी समन्वय साधून त्याला अटक केली. ट्रांझिट रिमांड आणि इतर कायदेशीर कारवाई करून त्याला बीडमध्ये आणले जाईल. त्याला मदत करणाऱ्यांवरही कारवाई करू - नवनीत काँवत, पोलिस अधीक्षक, बीड
 

Web Title: Satish Bhosale arrested Beed Police takes action with the help of Uttar Pradesh Polic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.