सासुरवाडीत जावयावर हल्ला; प्रकृती चिंताजनक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 00:31 IST2019-03-20T00:31:18+5:302019-03-20T00:31:44+5:30
घरगुती भांडणातून पत्नीला माहेरी सोडण्यासाठी आलेल्या तरुणाला सासुरवाडीतील लोकांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाची प्रकृती सध्या चिंताजनक आहे.

सासुरवाडीत जावयावर हल्ला; प्रकृती चिंताजनक
अंबाजोगाई : घरगुती भांडणातून पत्नीला माहेरी सोडण्यासाठी आलेल्या तरुणाला सासुरवाडीतील लोकांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. ही घटना मंगळवारी दुपारी अंबाजोगाई शहरातील मोंढा भागात घडली.
गणेश लहू खोत (वय २२, रा. सावळेश्वर पैठण, ता. केज) असे जखमी तरुणाचे नाव आहे. व्यवसायाने टेम्पो चालक असलेल्या गणेशचे लग्न मागील वर्षी अंबाजोगाईतील तरुणीसोबत झाले होते.
गणेशच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार लग्नानंतर काही महिन्यातच दोघात खटके उडू लागले. त्यामुळे मंगळवारी अंबाजोगाईच्या मोंढ्यातील आठवडी बाजारात भाजी घेऊन येतानाच त्याने पत्नीला माहेरी सोडण्यासाठी सोबत आणले. अंबाजोगाईत आल्यानंतर ते सर्वप्रथम मोंढ्यात गेले. त्या ठिकाणी गणेशच्या पत्नीने फोन करून माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेतले.
नातेवाईक आल्यानंतर त्यांनी लग्नात खर्च झालेला परत दे असे म्हणत गणेशवर हल्ला चढविला. या हल्ल्यात गणेशच्या डोक्याला मार लागून अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक झाली. आहे.
अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला लातूरला हलविण्यात आले आहे. अंबाजोगाई शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.