Santosh Deshmukh Walmik Karad News: दोन कोटी खंडणीच्य प्रकरणात फरार असलेल्या वाल्मीक कराडने आत्मसमर्पण केल्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. दोन कोटींची खंडणी आणि संतोष देशमुख हत्या या दोन्हींचा संबंध असल्याने सीआयडी या अनुषंगाने तपास करत आहे. सीआयडीने या प्रकरणात आता तीन लोकांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे.
पीटीआय वृत्तसंस्थेने सीआयडी अधिकाऱ्याच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, खंडणी प्रकरणाचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध आहे. याचसंदर्भात तीन लोकांना समन्स बजावण्यात आले आहे. समन्स बजावण्यात आलेल्या लोकांची नावे जाहीर करण्यास अधिकाऱ्याने नकार दिला.
तिघांची खंडणी प्रकरणात चौकशी केली जाणार आहे. जे आरोपी फरार आहेत. त्यांचा शोधही सुरू आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
सुदर्शन घुले अजूनही मोकाट
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि इतर आरोपी २२ दिवसांपासून मोकाट आहे. सीआयडीने केज न्यायालयात सांगितले होते की, सुदर्शन घुले हा वाल्मीक कराडच्या सांगण्यावरून काम करत होता. त्याला पकडण्यासाठी वाल्मीक कराडची कोठडी महत्त्वाची आहे. बुधवारी (१ जानेवारी) सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने वाल्मीक कराडची चौकशी केली.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यात आले होते आणि ९ डिसेंबर रोजी अमानुषपणे हत्या करण्यात आली होती. दोन कोटी खंडणी देण्याला विरोध करण्यावरून वाद झाला होता. त्यानंतर संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली.
या हत्या प्रकरणात आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आलेली आहे. वाल्मीक कराडचा यात सहभाग असल्याचे आरोप केले जात आहे. पण, त्याला दोन कोटी खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेले आहे.