Santosh Deshmukh Murder: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यभर गाजत आहे. आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस आणि सीआयडीची पथके तयार करण्यात आली आहेत. मात्र, २२ दिवसानंतरही आरोपी मोकाट त्यामुळे आता मस्साजोगचे ग्रामस्थ जलसमाधी आंदोलन करणार आहेत. १ जानेवारी रोजी ग्रामस्थ नदीत आंदोलन करणार आहेत.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आरोपींना पकडण्यात पोलीस सपशेल अपयशी ठरल्याचे दिसत आहे. आरोपी अद्यापही मोकाट असून, पोलीस आणि सीआयडीकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.
आरोपींना अटक करण्यासाठी इतका वेळ लागत असल्याने विरोधकांकडून सरकारला लक्ष्य केले जात आहे. आता मस्साजोगमधील ग्रामस्थांनीही आक्रमक पवित्रा घेतला असून, उद्या (१ जानेवारी २०२५) जलसमाधी आंदोलन करणार आहे.
संपूर्ण गावात जलसमाधी आंदोलनाच्या ठिकाणी येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ३१ डिसेंबर २०२४ रोजी गावात तशी दवंडी देण्यात आली.
वाल्मीक कराडवरही आरोप
संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मीक कराडवरही आरोप होत आहेत. वाल्मीक कराडचा या हत्या प्रकरणामध्ये सहभाग असल्याचा आरोप कुटुंबीयांनी आणि सत्ताधारी, विरोधी आमदारांनी केले आहे.
खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वाल्मीक कराड फरार झाला होता. ३१ डिसेंबर २०२५ रोजी वाल्मीक कराडने स्वतःला पुण्यात सीआयडीच्या मुख्यालयात आत्मसमर्पण केले. त्याला केजला आणण्यात आले आहे.
हत्या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू
संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे आरोपी फरार आहेत, त्यांच शोध पोलिसांकडून आणि सीआयडीकडून घेतला जात आहे. शोधासाठी विशेष पथके स्थापन करण्यात आली असून, लवकर आरोपींना अटक केले जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले आहे.