सहा तासांत उखडला रस्ता; चिंचाळा - तिगाव रस्त्याच्या कामाबाबत ग्रामस्थांचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2017 19:25 IST2017-12-18T19:24:45+5:302017-12-18T19:25:03+5:30
वडवणी तालुक्यातील तिगाव-चिंचाळा या दरम्यानचे रस्ता काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. अवघ्या सहा तासांतच रस्ता उखडल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. वेळीच यावर कारवाई झाली नाही, तर तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला.

सहा तासांत उखडला रस्ता; चिंचाळा - तिगाव रस्त्याच्या कामाबाबत ग्रामस्थांचा संताप
बीड : वडवणी तालुक्यातील तिगाव-चिंचाळा या दरम्यानचे रस्ता काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. अवघ्या सहा तासांतच रस्ता उखडल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. वेळीच यावर कारवाई झाली नाही, तर तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत तिगाव ते चिंचाळा या रस्त्याचे काम सुरू आहे. शुक्रवारी सकाळी या कामाला चिंचाळाकडून सुरूवातही झाली. परंतु यामध्ये डांबराचा जास्त वापर न करता केवळ खडी अंथरण्याचे काम केले जात आहे. विशेष म्हणजे सकाळी केलेला रस्ता सायंकाळच्या वेळेला उखडलेलाही दिसून आला. यावरून हे काम किती निकृष्ट दर्जाचे झाले आहे, याचा प्रत्यय येतो.
दरम्यान, चिंचाळा हे गाव मोठे आहे. नव्याने होत असलेल्या रस्त्यावरून दुकडेगावर, ह.पिंपरी, परडी माटेगाव, राजेवाडी, धानोरा, कुप्पा आदी गावांतील नागरिकांची वर्दळ असते. तसेच अवजड वाहनांचीही मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. त्यामुळे हा रस्ता दर्जेदार होणे गरजेचे आहे. रस्ता काम निकृष्ट करून केवळ गुत्तेदार पोसण्याचा खटाटोप वडवणी बांधकाम विभागाकडून केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून केला जात आहे. या कामाची चौकशी करून संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.