धोका वाढतोय; पुन्हा पाच बळी, बाधितांचा आकडा ३० हजार पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:33 IST2021-04-10T04:33:33+5:302021-04-10T04:33:33+5:30
बीड : जिल्ह्याची कोरोनास्थिती दिवसेंदिवस बिकट बनत आहे. शुक्रवारीही पुन्हा ७३२ नवे रुग्ण आढळून आले. पाच जणांचा मृत्यू झाला. ...

धोका वाढतोय; पुन्हा पाच बळी, बाधितांचा आकडा ३० हजार पार
बीड : जिल्ह्याची कोरोनास्थिती दिवसेंदिवस बिकट बनत आहे. शुक्रवारीही पुन्हा ७३२ नवे रुग्ण आढळून आले. पाच जणांचा मृत्यू झाला. दिलासादायक हे की, ३३८ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. मागील काही दिवसांत मृत्यू आणि नव्या रुग्णांची संख्या पाहता जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढत असल्याचे दिसत आहे, तसेच एकूण बाधितांचा आकडाही ३० हजार पार गेल्याने चिंता व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी तब्बल ६ हजार ४९६ जणांची कोरोना चाचणी केली गेली. यामध्ये ५ हजार ७६४ जण कोरोना निगेटिव्ह आढळून आले, तर ७३२ नवे रुग्ण आढळून आले. बीड, अंबाजोगाई आणि आष्टीत सर्वाधिक रुग्ण आढळले. बीडमध्ये २१६, अंबाजोगाईत १२७, आष्टीत १२७, धारूरमध्ये १७, गेवराईत ५५, केजमध्ये ६७, माजलगावात ३५, परळीत ४८, पाटोद्यात २६, शिरूरमध्ये ०६ आणि वडवणी तालुक्यात ०८ नवे रुग्ण आढळून आले. दिवसभरात ३३८ जण कोरोनामुक्त झाले. त्यांना रुग्णालयातून सुटी दिली गेली, तसेच शुक्रवारी पाच जणांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे झाली. यामध्ये माजलगाव शहरातील समर्थनगर भागातील ५८ वर्षीय पुरुष, केज शहरातील ६५ वर्षीय महिला, अंबाजोगाई तालुक्यातील मुडेगाव येथील ७० वर्षीय महिला, केज तालुक्यातील नांदूरघाट येथील ६५ वर्षीय पुरुष, आष्टी तालुक्यातील देवीनिमगाव येथील ५५ वर्षीय महिलेचा मृतांमध्ये समावेश आहे.
दरम्यान, आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ३० हजार ५१४ झाली आहे. पैकी २६ हजार ७२४ जण कोरोनामुक्त झाले असून, ६९० जणांचा मृत्यू झाला आहे. जि.प.चे सीईओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार, जिल्हा साथरोग अधिकारी डाॅ. पी.के. पिंगळे यांनी ही माहिती दिली.