आष्टी, पाटोद्यानंतर सीईओंकडून गेवराईचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:23 IST2021-07-11T04:23:37+5:302021-07-11T04:23:37+5:30
बीड : आष्टी, पाटोद्यातील वाढत्या रुग्णसंख्येचा आढावा घेऊन उपाययोजना करण्याच्या सूचना केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी शनिवारी दिवसभर गेवराई तालुक्यात ...

आष्टी, पाटोद्यानंतर सीईओंकडून गेवराईचा आढावा
बीड : आष्टी, पाटोद्यातील वाढत्या रुग्णसंख्येचा आढावा घेऊन उपाययोजना करण्याच्या सूचना केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी शनिवारी दिवसभर गेवराई तालुक्यात ठाण मांडून होते. तहसीलदार, वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर त्यांनी काजळा गावाला भेट दिली. हाेम आयसोलेट रुग्णांना तत्काळ कोविड सेंटरमध्ये दाखल करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
काेरोना संसर्ग कमी करण्याच्या उद्देशाने २० मे रोजी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी कोरोनाबाधितांना होम आयसोलेशन बंद केेले होते; परंतु मध्यंतरी काही दिवस रुग्णसंख्या कमी झाल्याने सर्वच गाफील झाले. त्यामुळे बहुतांश रुग्ण विनापरवानगी होम आयसोलेट राहिले. घरात राहिले तरी काळजी न घेतल्याने घरातील व शेजारील व्यक्ती बाधित झाले. त्यामुळे रुग्ण संख्या पुन्हा वाढत आहे. जिल्ह्यात आष्टी, पाटोदा, केज या तालुक्यांत रुग्णसंख्या कमी होत नसल्याचे दिसते. हाच धागा पकडून मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार हे दोन दिवसांपासून आष्टी, पाटोदा तालुक्याचा आढावा घेण्यासह उपाययोजनांबाबत अधिकाऱ्यांना सूचना करीत आहेत. शनिवारी ते गेवराईत पोहोचले. पंचायत समिती कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. होम आयसोलेट राहिलेल्या रुग्णांना तत्काळ कोविड सेंटर अथवा रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना केल्या. यासाठी सर्वच अधिकाऱ्यांना रविवारी दुपारी २ वाजेपर्यंतचा वेळ दिला आहे. बैठकीला तहसीलदार सचिन खाडे, वैद्यकीय अधीक्षक डाॅ. महादेव चिंचोले, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. संजय कदम, गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप व तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
काजळा गावात शिबिराला भेट
गेवराईत अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर अजित कुंभार यांनी काजळा गावातील अँटिजन चाचणी शिबिराला भेट दिली. सरपंच, ग्रामसेवकांना सूचना केल्य,. तसेच बाधितांना कोविड सेंटरमध्ये दाखल होण्यास सांगितले. टीएचओ डॉ. संजय कदमही सोबत होते. त्यानंतर डॉ. कदम यांनी शेकटा गावात भेट देत आढावा घेतला.
--
काही लोक कोरोना नियंमाचे पालन करीत नाहीत. शिवाय गाफिल राहत असल्याचे वारंवार दिसत आहे. अद्यापही कोरोना गेलेला नाही, हे समजून घ्यायला हवे. आष्टी, पाटोदाचा आढावा घेतल्यानंतर गेवराईतही सूचना केल्या. होम आयसोलेट रुग्णांना रविवारी दुपारी २ पर्यंत सीसीसी, रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना केल्या आहेत. कंटेनमेंट झोनचीही अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. आष्टीत चार दिवसांत सुधारणा झालेली दिसले. डीएचओ आढावा घेत आहेत.
-अजित कुंभार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.बीड.
100721\10_2_bed_46_10072021_14.jpeg
काजळा गावात मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी अचानक भेट देत सरपंच, ग्रामस्थांशी संवाद साधला. सोबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय कदम होते.