पुन्हा एक 'एमएलएम' घोटाळा उघड; मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेकांचे लाखो रुपये बुडाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 15:16 IST2021-03-05T15:16:02+5:302021-03-05T15:16:31+5:30
MLM fraud काही दिवसांनी त्याने सभासदांना परतावा देणे बंद केल्याने खळबळ उडाली.

पुन्हा एक 'एमएलएम' घोटाळा उघड; मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेकांचे लाखो रुपये बुडाले
कडा ( बीड ) : ओंकार हेल्थ फाऊंडेशनच्या नावाखाली मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेकांची 'एमएलएम' व्यवसायात लाखोंची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून फसवणारा सूत्रधार अजय मच्छिंद्र खोसे यास अंभोरा पोलिसांनी बुधवारी सायंकाळी बेड्या ठोकल्या. यानंतर तपासातून त्याने अनेकांची फसवणूक केल्याची कबुली दिल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राहुल लोंखडे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, कर्जत येथील आनंदवाडीतील अजय मच्छिंद्र खोसे याने काही वर्षांपूर्वी ओंकार हेल्थ फाऊंडेशनची स्थापना केली. याची रीतसर पब्लिक ट्रस्ट म्हणून नोंदणी केली. याचे सभासद होण्यासाठी 650 रूपये भरायचे. सभासदाने झाल्यानंतर त्याने दुसरा सभासद केला तर त्याला 1200 रुपये मिळणार अशी 'एमएलएम' स्कीम त्याने सुरु केली. सुरुवातीला त्याने अनेकांना चांगला परतावा दिला. यामुळे त्याच्यावर विश्वास बसल्याने सभासद वाढत गेले. दरम्यान, वर्षभरात अजय खोसेने मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात या योजनेचे जाळे विणले आणि लाखोंची माया जमा केली.
काही दिवसांनी त्याने परतावा बंद केल्याने सभासदांमध्ये खळबळ उडाली. याप्रकरणी एका सभासदाने अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यानंतर पोलीस उपनिरीक्षक राहुल लोंखडे व त्याच्या पथकाने मोठ्या शिताफिने अजय खोसेला त्याच्या सासुरवाडी अरणगाव (ता. जामखेड ) येथून ताब्यात घेतले. पोलीस तपासात मोठ्या परताव्याचे आमिष देऊन अनेकांना फसवल्याची कबुली त्याने दिली आहे. फसवणुकीचा एकूण आकडा आणि याची व्याप्ती वाढणार अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.