एकमेकांकडे बोट न दाखवता शेतकऱ्यांच्या तक्रारी 'ऑन दि स्पॉट' सोडवा - खा. प्रीतम मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 15:23 IST2021-06-28T15:19:40+5:302021-06-28T15:23:01+5:30
MP Pritam Munde या मार्गावरील अतिरिक्त संपादनातील घरे, विहर, फळबाग, पाईपलाईन यांची शहानिशाकरून तातडीने मावेजा द्यावा

एकमेकांकडे बोट न दाखवता शेतकऱ्यांच्या तक्रारी 'ऑन दि स्पॉट' सोडवा - खा. प्रीतम मुंडे
आष्टी : रेल्वेसह महसूल, कृषी अधिकार्यांनी एकत्रित येऊन शेतकऱ्यांच्या तक्रारी आॅन दि स्पाॅट सोडवाव्यात. एका खात्याने दुसऱ्या खात्याकडे बोट न दाखवता ठरवून दिलेली कामे जबाबदारीने पूर्ण करून महिनाभरात तक्रारी दूर कराव्यात अशा सूचना खा. प्रितम मुंडे यांनी आज अहमदनगर-बीड-परळी रेल्वेच्या मावेजाबाबत येथील तहसील कार्यालयात आढावा बैठकीत दिल्या. तसेच या मार्गावरील अतिरिक्त संपादनातील घरे, विहर, फळबाग, पाईपलाईन यांची शहानिशाकरून तातडीने मावेजा शेतकऱ्यांना देण्याची सूचना देखील खा. मुंडे यांनी केली. ( MP Pritam Munde on Beed Railway Issue )
सोमवारी खा.डॉ.प्रीतम मुंडे व माजी.आ.भीमसेन धोंडे यांनी अहमदनगर- बीड - परळी या रेल्वेमार्गाचे आष्टी तालुक्यात सुरु असलेल्या कामाची पाहणी करुन आष्टी (चिंचाळा) येथील रेल्वेस्टेशन कामाची पाहणी केली. तसेच आष्टी तहसील कार्यालयात आढावा बैठकी घेऊन थकीत मावेजा प्रकरणी पुढे खा. मुंडे म्हणाल्या की, सध्या ४४ हेक्टर भूसंपादन राहिले असून सर्वात जास्त आष्टी तालुक्यात राहिले आहे. तालुक्याचा १५ दिवसांत प्रश्न मार्गी लावा. रेल्वे, भूसंपादन, कृषी अधिका-यांनी आॅन दि स्पाॅट ८ दिवसांत शेतक-यांचे प्रश्न मार्गी लावा. यावेळी शेतक-यांनी रेल्वे ब्रीज आॅप्शन रोड हे अत्यंत निकृष्ट व लेवल मध्ये न केल्याने जाण्या येण्याची अडचण निर्माण झाली आहे. अशी तक्रार करताच आॅप्शन रोड दुरुस्त करण्याच्याही सूचना त्यांनी अधिका-यांना दिल्या आहेत. बैठकीला आ. बाळासाहेब आजबे,माजी. आ.भिमसेन धोंडे, उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसिलदार राजाभाऊ कदम, सविता,गोल्हार, अॅड वाल्मिक निकाळजे, विजय गोल्हार, सभापती सुवर्णा लाबरूड, शंकर देशमुख, शैलेजा गर्जे, अशोक पोकळे, उपसरपंच सुग्रीव नागरगोजे,अंकुश नागरगोजे,संदिप नागरगोजे हे उपस्थित होते.
गैरप्रकारामुळे काम लांबले
शेतकऱ्यांच्या बोगस विहिरी, फळबाग आणि घरे यांची नोंद केल्याच्या तक्रारी येत आहेत. यामुळे रेल्वे येण्यासाठी वेळ लागत आहे. सोलापूरवाडीपर्यंत टेस्टिंग झाली आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी तक्रारी तात्काळ सोडवल्या तर थोड्याच दिवसात रेल्वेचे काम पूर्ण होईल
- आ. बाळासाहेब आजबे
रेल्वेचे काम संथ गतीने सुरू आहे
भूसंपादन काम स्लो चालले असल्यामुळे रेल्वेचे काम रखडले आहे.आष्टी पर्यंत रेल्वे येण्यास काम जलदगतीने केल्यास अडचण नाही शेतक-यांना नियमाप्रमाणे मावेजा द्या
- माजी आ.भिमसेन धोंडे