ठाण मांडलेल्या ११ तलाठ्यांना आष्टी तालुक्यातून बदला; आष्टी तहसीलदारांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 17:20 IST2025-05-23T17:14:13+5:302025-05-23T17:20:01+5:30

तलाठ्यांसह काही कर्मचारी हे दीर्घकाळ एकाच तालुक्यात कार्यरत आहेत, तसेच ते स्थानिक आहेत. यामुळे त्यांच्या कामावर विपरीत परिणाम होत आहे.

Replace 11 Talathis from Ashti taluka who were not transferred from 14 years; Ashti Tehsildar's letter to the Beed District Collector | ठाण मांडलेल्या ११ तलाठ्यांना आष्टी तालुक्यातून बदला; आष्टी तहसीलदारांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

ठाण मांडलेल्या ११ तलाठ्यांना आष्टी तालुक्यातून बदला; आष्टी तहसीलदारांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

- नितीन कांबळे
कडा :
आष्टी तालुक्यात काही तलाठी हे १४ वर्षांपासून एकाच तालुक्यात कार्यरत आहेत, तसेच काही कर्मचारी याच तालुक्यातील रहिवासी आहेत. यामुळे काम करताना तक्रारी वाढत आहेत. वारंवार त्यांची सज्जा बदलण्याकरिता नागरिक, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा दबाव वाढत आहे. त्यामुळे ६ वर्षांपेक्षा अधिक सेवा झालेल्या तलाठ्यांची तालुक्याबाहेर बदली करावी, असे पत्र तहसीलदार वैशाली पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. यावरून ११ तलाठ्यांच्या बदल्या होणार आहेत. यामुळे ठाण मांडलेल्या तलाठ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

तलाठ्यांसह काही कर्मचारी हे दीर्घकाळ एकाच तालुक्यात कार्यरत आहेत, तसेच ते स्थानिक आहेत. यामुळे त्यांच्या कामावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे तालुक्यातील एकूणच कामावर परिणाम होत आहे. या कर्मचाऱ्यांना वारंवार नोटीस देण्यात आलेली आहे. तरीही त्यांच्या कामामध्ये कोणतीच सुधारणा होत नाही, तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घोषित होण्याची शक्यता नाकारता येत नाही, यामध्ये स्थानिक कर्मचारी काम करत असल्याने तक्रारी मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे. नवीन भरतीमध्ये आलेला तलाठी वर्ग हा त्यांचेच अनुकरण करत आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करता ६ वर्षे सेवा पूर्ण झालेल्या तलाठ्यांची तालुक्याच्या बाहेर बदली करावी, असे पत्र आष्टीच्या तहसीलदार पाटील यांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना पाठविले आहे.

यापूर्वी बदल्या का नाहीत?
वैशाली पाटील यांच्या पत्राने महसूलमधील बदल्यांचा सावळागोंधळ लक्षात आला आहे. स्वग्राण आणि नियमानुसार ६ वर्षांत बदली होणे अपेक्षित असतानाही यापूर्वीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बदली का केली नाही? असा प्रश्न आहे. यावरून तलाठ्यांनी राजकीय वशिला लावून आपल्या बदल्या थांबविल्याचा संशय आहे. त्यांना कोणत्या राजकीय नेत्यांचे अभय आहे, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

तलाठी - कार्यकाळ
एस.एम. केमधरणे - १४ वर्षे ८ महिने
एस.एम. दगडखैर - १० वर्षे ११ महिने
नंदा शिंदे - ९ वर्षे ७ महिने
जी.के.गावडे - ९ वर्षे ७ महिने,
छाया मेश्राम - ८ वर्षे ५ महिने
जगदीश राऊत - ७ वर्षे ४ महिने
आय. एच. शेंदूरकर - ७ वर्षे ६ महिने
प्रवीण बोरुडे - ६ वर्षे १० महिने
डी.यू. अनारसे - ९ वर्षे
बी.एस. कवळे - ९ वर्षे ६ महिने,
बाळू बनगे - १२ वर्षे

Web Title: Replace 11 Talathis from Ashti taluka who were not transferred from 14 years; Ashti Tehsildar's letter to the Beed District Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.