अंबाजोगाईत जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 15:51 IST2020-04-21T15:50:27+5:302020-04-21T15:51:44+5:30
सदरील बालिका गर्भवती राहिल्याने हा घृणास्पद प्रकार उघडकीस आला.

अंबाजोगाईत जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार
अंबाजोगाई : तालुक्यातील बर्दापूर येथील ४५ वर्षीय व्यक्तीवर गावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर मागील सहा महिन्यापासून सतत अत्याचार केल्याच्या आरोपावरून गुन्हा नोंद करण्यात आला. सदरील बालिका गर्भवती राहिल्याने हा घृणास्पद प्रकार उघडकीस आला.
दत्तात्रय शिवाजी मोरे असे आरोपीचे नाव आहे. पिडीतेने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, दत्तात्रयने मागील सहा महिन्यापासून स्वत:च्या घरी नेऊन तिच्यावर सतत अत्याचार केला. याबाबत कोणाला सांगितल्यास गळफास देवून जीवे मारण्याची धमकी दत्तात्रयने पिडीतेला दिली होती. त्यामुळे जीवाच्या भितीने पिडीतेने याबाबत कुठेही वाच्यता केली नाही. सततच्या अत्याचारातून पिडीता गर्भवती राहिली. त्यानंतर पिडीतेने धीर एकवटून बर्दापूर पोलीस ठाणे गाठले आणि झालेल्या अत्याचाराबद्दल तक्रार दिली. याप्रकरणी दत्तात्रय मोरे याच्यावर पोक्सो आणि बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास सहा. पोलीस निरिक्षक शिंदे करत आहेत.
चार दिवसांची पोलीस कोठडी
दरम्यान, गुन्हा दाखल होताच बर्दापूर पोलिसांनी असून दत्तात्रयचा तातडीने शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या. दत्तात्रयला सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.