४५ वर्षांच्या राजकीय जीवनात पहिल्यांदाच नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढली अन् जिंकली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 17:06 IST2025-12-22T17:01:28+5:302025-12-22T17:06:04+5:30
मुंदडा विरुद्ध मोदी या अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत दोन्ही बाजूंनी प्रचार यंत्रणा तुल्यबळ होती.

४५ वर्षांच्या राजकीय जीवनात पहिल्यांदाच नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढली अन् जिंकली
- अविनाश मुडेगावकर
अंबाजोगाई : आपल्या ४५ वर्षांच्या राजकीय जीवनात नंदकिशोर मुंदडा हे पहिल्यांदाच नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक रिंगणात उतरले व त्यांनी राजकिशोर मोदी यांचा २४९७ मतांनी पराभव केला.
मुंदडा विरुद्ध मोदी या अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत दोन्ही बाजूंनी प्रचार यंत्रणा तुल्यबळ होती. मात्र, या निवडणुकीत नंदकिशोर मुंदडा यांच्यासाठी आ. नमिता मुंदडा व अक्षय मुंदडा यांनी डोअर टू डोअर प्रचार केला. विधानसभेच्या निवडणुकीत मुंदडा यांना अंबाजोगाई शहराने कमी लीड दिल्याचे करणे शोधून मुंदडा परिवाराने या निवडणुकीत ही कसर भरून काढली. मात्र, गेल्या २५ वर्षांपासून नगरपरिषदेवर वर्चस्व असणाऱ्या राजकिशोर मोदी यांचे ३१ पैकी २० नगरसेवक निवडून येऊनही मोदी यांना पराभव पत्करावा लागला. आजपर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये प्रथमच मुंदडा विरुद्ध मोदी एकमेकांसमोर आले. यात नगराध्यक्ष पदासाठी मुंदडा यांची बाजू तुल्यबळ ठरली. मात्र, या निवडणुकीत राजकिशोर मोदी यांच्यासह त्यांचे पुत्र संकेत मोदी यांनाही नगरसेवक पदासाठी पराभवाचा सामना करावा लागला.
मुंदडा यांच्या विजयाची कारणे
नंदकिशोर मुंदडा हे पहिल्यांदाच नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीस उभे राहिले.
माझी ही पहिली व शेवटची निवडणूक या त्यांच्या भावनिक आवाहनाला मतदारांनी साद घातली.
अंबाजोगाई शहरात आ. नमिता मुंदडा यांनी केलेली विकासकामे याचा मोठा फायदा मुंदडा यांना झाला.
पराभवाची कारणे :
अक्षय मुंदडा यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदींवर अनेक आरोप केले. मात्र, या आरोपांचे खंडण करण्यात मोदी कमी पडले.
गेल्या ४ वर्षांपासून नगरपरिषदेवर प्रशासक राहिल्याने मोदी नगरपरिषदेच्या राजकारणापासून दूर राहिले.
सुसंगत प्रचार यंत्रणेचा अभाव राहिल्याने प्रभागात जास्त जागा मिळाल्या. मात्र, नगराध्यक्ष पदासाठी कमी मते मिळाली.