पोलीस पतीच्या जाचाला कंटाळून गर्भवती पत्नीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 08:35 PM2021-09-14T20:35:30+5:302021-09-14T20:37:55+5:30

गोविंद जाधवर हा पोलीस अंमलदार असून सध्या उस्मानाबाद जिल्ह्यात कार्यरत आहे.

Pregnant wife commits suicide after being harassed by police husband | पोलीस पतीच्या जाचाला कंटाळून गर्भवती पत्नीची आत्महत्या

पोलीस पतीच्या जाचाला कंटाळून गर्भवती पत्नीची आत्महत्या

Next
ठळक मुद्देहुंड्यातील आठ लाखांसाठी छळपतीसह सासू व सासऱ्यावर गुन्हा नोंद

नांदूरघाट (जि.बीड) : हुंड्यातील आठ लाख रुपयांसाठी पोलीस पतीकडून सुरू असलेल्या जाचक छळाला कंटाळून गर्भवती पत्नीने माहेरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना दरडवाडी (ता.केज) येथे १२ सप्टेंबर रोजी घडली. गौराई सणाच्या पूर्वसंध्येला ही घटना घडल्याने गाव शोक मग्न झाले. दरम्यान, पतीसह सासू व सासऱ्यावर गुन्हा नोंद झाला. ज्योती गोविंद जाधवर (२४, रा. उक्कडगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर) असे मयत विवाहितेचे नाव आहे.

फिर्यादीत म्हटले की, गोविंद जाधवर हा पोलीस अंमलदार असून सध्या उस्मानाबाद जिल्ह्यात कार्यरत आहे. ज्योतीचे वडील शिवाजी दराडे हे ऊसतोड मजूर आहेत. २०१८ मध्ये त्यांनी मुलीचा विवाह गोविंद जाधवर याच्याशी थाटामाटात लावला; परंतु लग्नानंतर तीन महिन्यांपासून सासू लताबाई, सासरा वचिष्ट व पती गोविंद हे ज्योतीला हुंड्यातील राहिलेल्या आठ लाख रुपयांसाठी त्रास द्यायचे. मी पोलीस आहे, तुझे आई-वडील ऊसतोड मजूर आहेत. तुझे भाऊ शेतीत काम करतात. या सर्वांना जेलमध्ये घालीन, अशा धमक्या गोविंद द्यायचा. वडील, चुलते, भाऊ यांनी उक्कडगाव या ठिकाणी जाऊन समजावून सांगितले. आणखी पैसे देऊ; पण मुलीला त्रास देऊ नका, अशी विनंती केली होती. ज्योतीला दीड वर्षाचा मुलगा असून ती दुसऱ्यांदा आठ महिन्यांची गरोदर होती. मात्र, ११ रोजी मध्यरात्री गोविंदने ज्योतीला दरडवाडीत आणून सोडले.

दरम्यान, दुसऱ्या दिवशी १२ सप्टेंबर रोजी माहेरकडील मंडळी शेतात गेले. सायंकाळी ते घरी परतल्यावर घरातील आडूला ज्योतीने दोरीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. मयत ज्योतीचा भाऊ बबन दराडे यांच्या फिर्यादीवरून केज ठाण्यात पती गोविंद, सासू लताबाई व सासरा वचिष्ट जाधवर यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, संतोष मिसळे यांनी घटनास्थळी भेट दिली.
 

पतीशी फोनवर बोलल्यानंतर टोकाचे पाऊल
मयत ज्योती आत्महत्या करण्यापूर्वी फोनवर पतीशी बोलत होती. जवळपास अर्धा तास तिचे पतीशी संभाषण सुरू होते, असे शेजाऱ्यांनी सांगितले. नांदूरघाट प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांकडे दिला. १३ रोजी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Pregnant wife commits suicide after being harassed by police husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.