The pregnant married women returned against her will; The next day the parents found her body | इच्छा नसतानाही गर्भवती विवाहिता सासरी परतली; दुसऱ्या दिवशी आई-वडिलांना भेटला मृतदेह

इच्छा नसतानाही गर्भवती विवाहिता सासरी परतली; दुसऱ्या दिवशी आई-वडिलांना भेटला मृतदेह

ठळक मुद्देविवाहिता मृत्यू प्रकरणी पती, सासू, सासऱ्याविरुद्ध गुन्हामयत विवाहिता तीन महिन्यांची गर्भवती

सिरसाळा (जि. बीड) : परळी तालुक्यातील आचार्य टाकळी येथील विवाहिता मनीषा जगन्नाथ आचार्य (२२) बुधवारी घरात मृत अवस्थेत आढळली. त्यानंतर वडील मनोहर काळे यांच्या फिर्यादीवरून पती जगन्नाथ, सासरा संदीपान, सासू संजीवनी आचार्य यांच्याविरुद्ध हुंडाबळी कायद्यासह मनुष्य वधाच्या कलमाखाली गुन्हा नोंदविण्यात आला. नातेवाईकांना साशंकता वाटल्याने त्यांनी अंबाजोगाई स्वाराती रुग्णालयात उत्तरीय तपासणी केली. डॉक्टरांनी दिलेल्या अहवालात डोक्यात तसेच शरीरावर आतून मार लागल्याने मृत्यू झाल्याचा उल्लेख केला. 

पाडोळी येथील मनोहर काळे यांची मुलगी मनीषाचा विवाह आचार्य टाकळी येथील संदीपान आचार्य यांचा मुलगा जगन्नाथ याच्याशी गतवर्षी  झाला होता. जावई पाथरी येथील फार्मसी कॉलेजमध्ये नोकरीस असून त्यास मोठा हुंडाही दिला. लग्नानंतर चार महिन्यांतच कार घेण्यासाठी वडिलांकडून २ लाख रुपये घेऊन ये म्हणत, मनीषाचा सासरी छळ सुरू झाला. तसेच लग्नात सासूला सोन्याची अंगठी का घातली नाही म्हणून पतीसह सासू, सासरा मारहाण करीत. तिने हा प्रकार माहेरी आल्यावर आई-वडिलांना सांगितला. तिची सासरी जाण्याची इच्छा नसताना सर्वांनी समजूत घातल्यानंतर ती पुन्हा सासरी गेली. माहेरहून लवकर का आली नाही म्हणून त्याच दिवशी नवऱ्याने मनीषाला मारहाण केली. बुधवारी सकाळी एकाने काळे यांना तुमची मुलगी अत्यवस्थ असल्याचे फोनवरून सांगितले. तासाभरात वडील व इतर काही जण टाकळी येथे तिच्या घरी पोहोचले. त्यावेळी त्यांना मनीषाला फरशीवर टाकल्याचे दिसले. मनीषाने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याचे त्यांना सांगण्यात आले. 

२० तासांनंतर अंत्यसंस्कार, गावांत हळहळ
अंबाजोगाई स्वाराती रु ग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह थेट पोलीस ठाण्यात आणण्यात आला. सासरच्या मंडळीवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह न हलविण्याचा नातेवाईकांनी पवित्रा घेतला असता योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन सिरसाळा पोलिसांनी नातेवाईकांना दिले. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास २0 तासांनंतर माहेरी पाडोळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तोपर्यंत सर्व गाव जागेच होते. मनीषा  आचार्य या तीन महिन्यांच्या गर्भवती असल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत होती. 

पैसे, सोन्याच्या अंगठीसाठीच घेतला जीव
दरम्यान, पैसे व सोन्याच्या अंगठीसाठीच नवऱ्यासह सासू, सासऱ्यांनी संगनमत करून मनीषा यांना मारून टाकल्याची फिर्याद मनोहर काळे यांनी पोलिसांत दिली. सासरकडील तिघांविरुद्ध सिरसाळा पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जनक पुरी करीत आहेत.

Web Title: The pregnant married women returned against her will; The next day the parents found her body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.