प्रकाश आंबेडकर-विनायक मेटे भेटीचे संकेत काय..?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 12:00 AM2019-01-13T00:00:09+5:302019-01-13T00:00:51+5:30

बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तापू लागले आहे. नेते मंडळीच्या राजकीय हालचाली वाढल्या असून डावपेच आखले जात आहेत. गाठीभेटी वाढल्या असून संदेश दिले जात आहेत.

Prakash Ambedkar-Vinayak mete? | प्रकाश आंबेडकर-विनायक मेटे भेटीचे संकेत काय..?

प्रकाश आंबेडकर-विनायक मेटे भेटीचे संकेत काय..?

googlenewsNext

सतीश जोशी । लोकमत न्यूज नेटवर्क
बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तापू लागले आहे. नेते मंडळीच्या राजकीय हालचाली वाढल्या असून डावपेच आखले जात आहेत. गाठीभेटी वाढल्या असून संदेश दिले जात आहेत. पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी मतभेद वाढल्यामुळे शिवसंग्रामचे आ. विनायक मेटे हे जिल्ह्यातील भाजपापासून कोसो दूर गेले असून भावी राजकारणाची वाट शोधत आहेत.
जीवाभावाचा सहकारी युवा नेते राजेंद्र मस्के शिवसंग्राममधून बाहेर पडल्यापासून आ. मेटे हे काही दिवस बॅकफूटवर गेले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपली घट्ट मैत्री असल्याचे ते कितीही दाखवत असले तरी या त्यांच्या मैत्रीचा बीड जिल्ह्यातील भाजपावर अथवा नेतृत्वावर काहीही परिणाम होताना दिसत नाही. मध्यतंरी त्यांनी बीड जि.प.च्या समीकरणातून शिवसंग्राम बाहेर पडण्याचा इशारा दिला होता, परंतु, त्याचीही दखल पंकजा मुंडेंनी घेतली नव्हती. कारण त्यांच्या राहण्याने अथवा बाहेर पडण्याने भाजपाच्या जि.प.च्या सत्तेस काहीही धोका होणार नव्हता. बीड जिल्ह्यातील भाजपा आणि शिवसंग्राम यांच्यातील वाढती दरी कमी करण्याचा प्रयत्नही पक्षश्रेष्ठींकडून झाला नाही. यासर्व परिस्थितीवर अतिशय शांत चित्ताने मार्ग काढण्याचा प्रयत्न आ. मेटे करीत आहेत, हे त्यांच्या हालचालीवरून दिसते आहे. मतांचे राजकारण समोर ठेवून त्यांनीही डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुका लांब असल्या तरी बदलती समीकरणे लक्षात घेऊन बीडमध्ये हालचाली चालू आहेत. मागच्या निवडणुकीत कमळाच्या चिन्हावर आ. मेटे यांनी निवडणूक लढविली होती. यावेळी तर पंकजा मुंडे यांच्याशीच मतभेद झाले आहेत. तेव्हा वेगळी चूल मांडता येती का? याचा अंदाज मेटे घेत आहेत. बीड दौऱ्यावर आलेल्या अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी भेट घेण्यामागचा हा उद्देश असावा. ऐनवेळी जर भाजपाकडून धोका झाला तर हाती काही तरी असावे, हा त्यांचा उद्देश असावा. बहुजन मतांप्रमाणेच मुस्लीम मतांसाठीही त्यांच्या भेटीगाठी चालू असून वेगळा काही प्रयोग करता येतो का ? याची चाचपणी करीत आहेत. प्रकाश आंबेडकरांची भेट घेऊन भाजपालाही संकेत देण्याचा त्यांचा प्रयत्न असावा.
इकडे शिवसंग्राममधून बाहेर पडलेल्या राजेंद्र मस्के यांनी भाजपासोबतच शिवसेनेच्या नेते मंडळीशी संपर्क वाढविला आहे. भाजपा-शिवसंग्राम युती कायम राहिली तर आ.विनायक मेटे यांची उमेदवारी पक्की आणि आपल्याला भाजपाकडून संधी नाही, हे मस्के यांनाही कळाले आहे. भाजपा-शिवसेना युती झालीच नाही तर प्रयत्न करायला काय हरकत, यातला हा भेटीचा प्रकार आहे. आ.मेटे यांनी जशी आंबेडकरांची सदिच्छा भेट घेतली त्याचप्रमाणे शिवसेना नेते रामदास कदम यांनी मस्के यांच्या घरी जाऊन चहापाणी घेतले. दोन दिवसांनंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची बीडमध्ये सभा असल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. परंतु, वाटले तसे घडले नाही. अजूनही ते भाजप-शिवसेनेच्या कुंपणावरच आहेत. तसेच बसून राहतात की इकडे तिकडे उडी मारतात, याकडेही लक्ष लागले. मस्के यांनी कुठेही उडी मारली तरी त्याचा थोडाफार फटका आ.विनायक मेटे यांनाच बसणार हे ही तितकेच खरे.

Web Title: Prakash Ambedkar-Vinayak mete?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.