नृसिंह सूर्यवंशी
घाटनांदूर : घाटनांदूर व परिसरात मोठ्या प्रमाणात विजेचा लपंडाव सुरू असून दिवसांतून शेकडो वेळा सतत वीजपुरवठा खंडित होत आहे. या ठिकाणी अघोषित भारनियमन होत असल्याने दैनंदिन कामाचा खोळंबा होत आहे .वास्तविक पाहता वीजबिल वसुली शून्य टक्के असतानाही लोडशेडिंग का करण्यात येत आहे? हा प्रश्नच आहे. ग्राहक वाढले, कनेक्शन वाढले मात्र नवीन ट्रान्सफार्मर अद्याप देण्यात आलेला नाही. शेकडो वेळा वीज गायब होत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
येथील ३३ के. व्ही. सबस्टेशनमध्ये फक्त एकच पाच एमव्हीएचा ट्रान्सफार्मर असून, लोड वाढला की सर्रास वीजपुरवठा बंद करण्यात येतो. गत पाच वर्षांपासून आणखी एका पाच एमव्हीए ट्रान्सफार्मरची मागणी करण्यात येत आहे. ट्रान्सफार्मर बसवण्यासाठीचे स्ट्रक्चर उपलब्ध आहे. मात्र या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम वीज वितरण कंपनी करीत आहे. कुठेच भारनियमन नसताना घाटनांदूर येथे मात्र नियमित लोडशेडिंग होत असून, त्याचा दैनंदिन व्यवहारावर परिणाम होत आहे.
येथील ३३ के. व्ही. सबस्टेशन अंतर्गत पूस, घाटनांदूर, हातोला असे तीन फिडरमधून वीजपुरवठा होतो. शेतीसाठी वरील तीनही फिडरला एका आठवड्यात रात्री, तर दुसऱ्या आठवड्यात दिवसा थ्री फेज वीजपुरवठा होतो. जेव्हा जेव्हा थ्री फेज लाइट दिली जाते त्यावेळी दुसऱ्या फिडरला सिंगल फेज वीजपुरवठा अपेक्षित आहे. मात्र तसे न करता चक्क वीजपुरवठा वारंवार बंद करण्यात येतो. अनेक तासांचे सक्तीचे भारनियमन करण्यात येत आहे. पुरेशी वीज मिळत नसल्याने मजुरांना शेतात कामाला जावे का दळण आणण्यासाठी, पाणी भरण्यासाठी घरी थांबावे? असा यक्ष प्रश्न पडला आहे.
याबाबत तत्काळ निर्णय घेणे अपेक्षित असून, लोडशेडिंग बंद होणे गरजेचे आहे. या संदर्भात अंबाजोगाई विभागाचे उपकार्यकारी अभियंता संजय देशपांडे यांच्याशी संपर्क साधला असता कायमस्वरूपी अभियंता दिला असून, लोडशेडिंग बंद करू व कर्मचारी मुख्यालयी राहणे सक्तीचे करून तत्काळ नवीन पाच एमव्हीए ट्रान्सफार्मरसाठी वरिष्ठाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे सांगितले.