बीडमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी मदतीसाठी पोतराज आंदोलन
By शिरीष शिंदे | Updated: June 26, 2023 19:37 IST2023-06-26T19:37:32+5:302023-06-26T19:37:55+5:30
पंधरा दिवसांच्या आत मदत देण्याची सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

बीडमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी मदतीसाठी पोतराज आंदोलन
बीड: जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या वाढत आहे. शेतकरी आर्थिक संकटामुळे आत्महत्या करतात परंतु त्यांच्या पश्चात असलेल्या व्यक्तींना शासनाकडून आर्थिक मदत दिली जात नसल्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साेमवारी पोतराजाची वेषभुषा करुन स्वत:च्या अंगावर चाबकाचे फटके मारुन आंदोलन केले.
बीड जिल्ह्यात मागील ६ महिन्यात ११४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची शासन दरबारी नोंद असून प्रशासनाकडून आतापर्यंत केवळ एका मयत शेतकऱ्याच्या कुटुंबियाला आर्थिक मदत देण्यात आली आहे. मदत देण्यासाठी शासन निधी नसल्याचे कारण सांगितले जात आहे. राज्य सरकारला जाहिरात बाजीवर आणि मंत्र्यांच्या दौऱ्यावर अमाप उधळपट्टी करण्यासाठी शासनाकडे निधी आहे मात्र आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना देण्यासाठी निधी नाही. या वरुन शेतकऱ्यांप्रती सरकाची असंवेदनशीलता स्पष्ट दिसून येत आहे.
याकडे लक्ष सरकारचे वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साेमवारी पोतराजाचा वेशभुषा करुन स्वतःच्या अंगावर चाबकाचे फटके मारुन घेत इडा पिडा टळु दे, बळीचे राज्य येऊ दे असे साकडे घालत लक्ष्यवेधी आंदोलन केले. आंदोलनात रामनाथ खोड, शेख युनुस, बलभीम उबाळे, मिलिंद सरपते, शेख मुबीन, राहुल कवठेकर, विजय झोडगे, संजय सुकाळे, धनंजय सानप, सुरज थोरात आदी सहभागी होते.