अहमदनगर-जामखेड महामार्गावरील अतिक्रमणे हटविण्यास स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:25 IST2021-06-04T04:25:46+5:302021-06-04T04:25:46+5:30

अविनाश कदम आष्टी : तालुक्यातील अहमदनगर - कडा - आष्टी - जामखेड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६१ मधील रस्त्याच्या उजव्या ...

Postponement to remove encroachments on Ahmednagar-Jamkhed highway | अहमदनगर-जामखेड महामार्गावरील अतिक्रमणे हटविण्यास स्थगिती

अहमदनगर-जामखेड महामार्गावरील अतिक्रमणे हटविण्यास स्थगिती

अविनाश कदम

आष्टी : तालुक्यातील अहमदनगर - कडा - आष्टी - जामखेड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६१ मधील रस्त्याच्या उजव्या व डाव्या बाजूस विनापरवानगी नियमबाह्य अनधिकृत असलेली अतिक्रमणे काढण्यासाठी अहमदनगर येथील राष्ट्रीय महामार्ग उपविभागीय कार्यालयाने २ जून रोजी नाेटीस बजावल्यानंतर एकच खळबळ उडाली. चिंचपूर ते मेहकरी फाटा या ३७ किलोमीटर अंतरातील सर्व अतिक्रमणधारकांना या नोटिसा देण्यात आल्या होत्या. दरम्यान, गुरुवारी अतिक्रमणे तूर्त हटविण्यात येऊ नये म्हणून पालकमंत्र्यांनी नाशिक येथील अभियंत्यांना कळवून जागा अधिग्रहण तत्काळ स्थगित करण्याचे निर्देश दिल्याची माहिती आमदार बाळासाहेब आजबे यांनी दिली. त्यामुळे आष्टी, कडा भागातील धावपळ करणाऱ्या रहिवासी, व्यावसायिकांचा सध्यातरी जीव भांड्यात पडला आहे.

तालुक्यातील अहमदनगर - कडा - आष्टी - जामखेड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६१ वरील रस्त्याच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामे व पत्र्याची दुकाने अतिक्रमण व विना परवानगी नियमबाह्य बांधकामे काढण्याबाबत २ जून रोजी परत लेखी नोटीस देऊन एका दिवसात अतिक्रमण काढून घ्यावे, अन्यथा या खात्यामार्फत सदरचे बांधकाम ३ जूनपासून काढण्याचा इशारा अहमदनगर येथील उपविभागीय अभियंता डी. एन. तारडे यांनी संबंधित अतिक्रमणधारकांना दिला होता. या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवालाचे काम पूर्ण झाले असून अतिक्रमणधारकांना बुधवारी प्रत्यक्ष लेखी नोटीस दिल्याचे राष्ट्रीय महामार्ग उपविभागाचे शाखा अभियंता संतोष काळे यांनी सांगितले होते.

आमच्या वडिलोपार्जित मालकी हक्कातील जागेचा या नोटीसमध्ये अतिक्रमण असा उल्लेख केला असून मालकी हक्कातील जागेच्या बद्दल काही नमूद न करता नोटीस दिली आहे. त्यामुळे मालकी हक्कातील जागेमधील नागरिकांना नुकसान भरपाई मिळावी - कल्याण निकाळजे , भीमनगर आष्टी.

---------

अहमदनगर ते कडा आष्टी, जामखेड, बीड या महामार्गाचे काम अद्याप मंजूर झाले नाही. तसेच कुठेही बजेट पडले नसल्याने या महामार्गालगत आजच जमीन अधिग्रहण करणे योग्य नाही. सध्या कोरोना साथीमुळे सर्व छोटे-मोठे व्यापारी हैराण झाले आहेत. या व्यावसायिकांना रस्त्यावर आणू नये. या महामार्गाचे काम सुरू झाल्यावर त्वरित जागा अधिग्रहित करावी. तत्पूर्वी जागा अधिग्रहण करण्यास तूर्त स्थगिती द्यावी, अशी मागणी आमदार बाळासाहेब आजबे यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली होती. त्यानुसार पालकमंत्री मुंडे यांनी दखल घेत तत्काळ राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता नाशिक, बीड येथील जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना आदेशित करून जागा अधिग्रहणास तत्काळ स्थगित करण्याचे सांगितले असल्याचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी सांगितले.

-----

===Photopath===

020621\2207img_20210602_144904_14.jpg

Web Title: Postponement to remove encroachments on Ahmednagar-Jamkhed highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.