शेतात साचले तळे; बीड जिल्ह्याला परतीच्या पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 03:31 PM2020-10-12T15:31:02+5:302020-10-12T15:35:39+5:30

Return rains hit Beed district शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचा घास निसर्गाच्या प्रकोपाने हिरावून घेतला आहे.

Ponds in the farm field; Return rains hit Beed district | शेतात साचले तळे; बीड जिल्ह्याला परतीच्या पावसाचा फटका

शेतात साचले तळे; बीड जिल्ह्याला परतीच्या पावसाचा फटका

Next
ठळक मुद्देमांजरा धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढमाजलगाव धरणाचे ११ दरवाजे उघडले

बीड : जिल्ह्यातील सर्वच भागात शनिवारी दुपारपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली. रात्रभर पाऊस सुरु असताना रविवारी सकाळपासून जोर धरला. सायंकाळपर्यंतही पावसाच्या सरी कोसळतच होत्या. या पावसात खरिप हंगामातील पिकांची काढणी, मळणी सुरु असल्यामुळे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांनी काढून गंजी लावलेल्या सोयाबीन पाण्यात भिजले तर वेचणीसाठी आलेला कापूस भिजल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचा घास निसर्गाच्या प्रकोपाने हिरावून घेतला आहे.

जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून आक्टोंबर हिटच्या उन्हामुळे नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागला. मागील दोन दिवसांपासून आभाळ  भरुन येत होते. यातच शनिवारी दुपारी वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात परतीच्या पावसाला सुरुवात झाली. धारुर, शिरुर कासार, केज तालुक्यात विज पडल्याने एक शेतकरी ठार तर दुसरा जखमी झाल्याची घटना घडली. जिल्ह्यातील विविध ठिकाणी शनिवारी रात्रभर पाऊस पडत होता. रविवारी सकाळपासूनच जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. दिवसभर सूर्यदर्शनही झाले नाही. बीड शहरासह सकाळी १० वाजता पावसाला सुरुवात झाली. दिवसभर पाऊस सुरुच होता. गेवराई तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरालाही पावसाने झोडपून काढले. यात गेवराई तालुक्यातील वेचणीला आलेल्या कापसाचे प्रचंड नुकसान झाले आहे. तालुक्यातील अनेक नद्यांना आलेल्या पुरामुळे काही काळासाठी गावांचा संपर्क तुटला होता. पूर ओसल्यानंतर वाहतुक पूर्ववत झाली.

धारुर तालुक्यातही जोरदार पासवसाने हजेरी लावली. वीज दोन ठिकाणी विज पडली.यात पहिल्या ठिकाणी बाजरीच्या गंजीवर पडल्यामुळे आग लागली. तर दुसऱ्या ठिकाणी पडलेल्या विजेमुळे एक म्हैस ठार झाली.  आष्टी तालुक्यातही सलग तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे.  यात शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पेरलेल्या ज्वारीचे मोठे नुकसान झाले आहे. खरिपाच्या हंगामातील काढणी केलेल्या आणि मळणी सुरु असलेल्या पिकांचेही नुकसान झाले आहे. वडवणी तालुक्यात परतीच्या पावसाने खरीप हंगामील पिकांची प्रचंड नासाडी केली. बाजरी, कापूस , सोयाबीन पीक हाता आलेले असताना हिरावून घेतल्याची परिस्थिती आहे. आष्टी तालुक्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. आष्टी शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे नुकसान झाले आहे. माजलगाव तालुक्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे कापसाच्या पिकाचे नुकसान झाले आहे. अंबाजोगाई तालुक्यातही तुफान पाऊस झाला.


१ जून ते ११ आॅक्टोबरपर्यंत ७३९.८ मि.मी. पाऊस
बीड जिल्ह्यात पर्जन्यमानाची वार्षिक सरासरी ६३८.९० मिमी इतकी आहे. १ जून ते ११ आॅक्टोबर दरम्यान जिल्ह्यात एकूण ७३९.८ मिमी पाऊस नोंदला आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत १२६ टक्के पाऊस झाला आहे. परतीच्या पावसामुळे मात्र हाती आलेल्या खरिपाच्या पिकांना फटका बसला तर रबीची पेरलेली बियाणे भिजून सडण्याचा  धोका वाढला आहे. 

धरणे पुन्हा ओसंडली
परतीच्या पावसात अगोदरच भरलेली धरणे पुन्हा एकदा ओव्हरफ्लो झाल्याचे चित्र जिल्ह्याभरात पाहायला मिळाले. बीड जिल्ह्यातील सर्वांत मोठे धरण असलेल्या माजलगाव धरणाचे तीन दरवाजे शनिवारी पहाटेच उघडण्यात आले. याशिवाय आष्टी शहराला पाणीपुरवठा करणारे ब्रम्हगांव तलाव तब्बल चार वर्षांनी भरला. याशिवाय इतर मध्यम, लघु आणि साठवण तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत.


माजलगाव धरणातून विसर्ग
परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने माजलगाव धरणाचे ११ दरवाजे सोमवारी सकाळी उघडण्यात आले. त्यातुन प्रतिसेकंद २२ हजार क्युसेसने पाणी सिंदफना पात्रात सोडण्यात येत आहे. मागील आठवड्यापर्यंत एक दरवाजातुन एक हजार क्यूसेकने पाणी सोडण्यात येत होते. त्यात आता वाढ केली आहे. जास्त पाऊस झाला तरी नियोजन करण्यात आल्याची माहिती धरणाचे उपविभागीय अधिकारी सी. एम.झेंड, कनिष्ठ अभियंता बी.आर.शेख यांनी दिली आहे.

मांजरा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ
केज तालुक्यात शनिवारपासून झालेल्या धनेगाव येथील मांजरा धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होत आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मांजरा धरणातील पाणीसाठ्यात २०  सेंटिमीटरने वाढ झाली. धरणाच्या वरच्या बाजूस पाऊस पडत असल्याने पाणीसाठ्यात वाढ होत असल्याची माहिती मांजरा धरणाचे सहायक अभियंता शहाजी पाटील यांनी लोकमतला दिली. शनिवारपासून झालेल्या पावसाचा रबीच्या पिकांना फायदा होणार असलातरी खरिपाचे हातचे आलेल्या पिकांना मात्र फटका बसला आहे. 

Web Title: Ponds in the farm field; Return rains hit Beed district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.