बीड : जिल्ह्याच्या राजकारणात सध्या महायुतीतील नेत्यांमध्ये सुरू असलेला अंतर्गत संघर्ष शिगेला पोहोचला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार धनंजय मुंडे, आमदार प्रकाश सोळंके यांच्यातील राजकीय वैर काही केल्या थांबताना दिसत नाही. महायुतीमधील हे चार प्रमुख नेते आपापल्या पक्षासाठी काम करण्याऐवजी एकमेकांना लक्ष्य करत असल्याने, त्याचा थेट फटका आता नगरपालिका निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)मध्ये सर्वांत गंभीर परिस्थिती आहे. माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी थेट आमदार धनंजय मुंडे यांना आव्हान दिले आहे. "धनंजय मुंडे हे स्टार प्रचारक असले तरी त्यांना माजलगावात पाठवू नका, कारण त्यांच्या येण्याने विपरीत परिणाम होईल," अशी थेट मागणी सोळंके यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. सोळंके यांनी केलेली ही टीका म्हणजे, मुंडे यांच्या नेतृत्वाचा त्यांच्या मतदारसंघात असलेला प्रभाव स्वीकारायला ते तयार नाहीत, हे स्पष्ट होते. एकाच पक्षातील दोन मोठ्या नेत्यांमध्ये असा उघड संघर्ष झाल्याने पक्षाची प्रतिमा खराब होत असून, स्थानिक पातळीवर पक्षाच्या उमेदवारांची कोंडी झाली आहे.
भाजपमध्येही नेतृत्वाला आव्हानभाजपमध्येही अंतर्गत वाद कायम आहे. मंत्री पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर संधी मिळूनही, आमदार सुरेश धस यांनी सातत्याने त्यांच्यावर टीका करण्याची भूमिका कायम ठेवली आहे. तसेच, धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणासारख्या मुद्द्यांवरून आमदार धनंजय मुंडे यांनाही कोंडीत पकडले आहे. याचा अर्थ, महायुतीत कोणताही नेता दुसऱ्या नेत्याचे वर्चस्व मान्य करायला तयार नाही, ज्यामुळे पक्षाच्या कामात समन्वय साधणे कठीण झाले आहे.
या दोन आमदारांचे मौनया सर्व राजकीय गोंधळात राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) गेवराईतील आमदार विजयसिंह पंडित आणि भाजपच्या केजमधील आमदार नमिता मुंदडा हे दोन आमदार मात्र या सर्व राजकीय परिस्थितीवर मौन बाळगून आहेत. त्यांनी या वादापासून दूर राहून आपले लक्ष मतदारसंघावर केंद्रित केले आहे. हा त्यांचा राजकीय बचावाचा पवित्रा मानला जात आहे. सध्या आ. मुंदडा अंबाजोगाई, तर आ. पंडित हे बीड आणि गेवराई पालिका निवडणुकीत व्यस्त आहेत.
अजित पवारांची कसोटीआमदार सोळंके यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवारी बीडच्या धावत्या दौऱ्यावर होते. सोळंके यांनी त्यांची धारूरमध्ये भेट घेत स्वागत केले; पण पक्षातील दोन महत्त्वाचे आमदार एकमेकांविरुद्ध उभे ठाकले असल्याने अजित पवारांची कसोटी आहे. सोबतच पालकमंत्री असतानाही त्यांना पाच नगरपालिकांमध्ये युतीतील भाजपचे आव्हान असल्याने प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
Web Summary : Beed's ruling coalition faces turmoil as internal conflicts intensify among key legislators. Public disputes between leaders from BJP and NCP (Ajit Pawar faction) threaten upcoming municipal elections. Factionalism and leadership challenges create hurdles for coordination, testing Ajit Pawar's leadership amidst rising tensions.
Web Summary : बीड में सत्तारूढ़ गठबंधन में आंतरिक संघर्ष गहरा गया है, जिससे प्रमुख विधायकों के बीच तनाव बढ़ गया है। भाजपा और एनसीपी (अजित पवार गुट) के नेताओं के बीच सार्वजनिक विवाद आगामी नगरपालिका चुनावों को खतरे में डाल रहे हैं। गुटबाजी और नेतृत्व की चुनौतियाँ समन्वय के लिए बाधाएँ पैदा करती हैं, जिससे बढ़ते तनाव के बीच अजित पवार के नेतृत्व की परीक्षा हो रही है।