त्रास देणारा फोन कॉल ? ; बीडमध्ये पोलिसाची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 12:03 PM2019-12-18T12:03:29+5:302019-12-18T12:06:38+5:30

पिस्तूल डाव्या हातात धरून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.

Policeman's suicide by firing on self in Beed | त्रास देणारा फोन कॉल ? ; बीडमध्ये पोलिसाची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या

त्रास देणारा फोन कॉल ? ; बीडमध्ये पोलिसाची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या

Next
ठळक मुद्दे खिशातून एक चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

बीड : शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत  पोलीस शिपाई दिलीप प्रकाश केंद्रे (३३, रा. धावडी, ता. अंबाजोगाई) यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सायंकाळी ५ ते ५.३०च्या दरम्यान शहरालगत एका शेतात घडली. ते ६ ते ७ महिन्यांपूर्वी जळगाव येथून शिवाजीनगर, बीड येथे रुजू झाले होते. त्यांची नेमणूक डीबी पथकात केली होती. केंद्रे हे मंगळवारी रोजच्या प्रमाणे कर्तव्यावर आले होते. दिवसभर त्यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या, त्यानंतर दुपारी चारच्या सुमारास ते त्यांच्या स्वराज्यनगर भागातील घरी गेले होते. सायंकाळी ५ ते ५.३०च्या दरम्यान ते सावता चौकाच्या पुढे असलेल्या शेतात गेले. यावेळी त्यांनी त्यांच्याकडील पिस्तूल डाव्या हातात धरून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.

जोराचा आवाज झाल्यानंतर जवळून जाणाऱ्या काही युवकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी लगेचच शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळावरून पिस्तूल, झाडलेल्या गोळीचे आवरण, मोबाईल असे साहित्य ताब्यात घेतले आहे. केंद्रे यांच्या खिशातून एक चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. त्यातील तपशील कळू शकला नाही. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, ४ वर्षाची मुलगी असा परिवार आहे. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून, ब्लॅकमेलिंगला कंटाळून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.  

त्रास देणारा फोन?
केंद्रे हे त्यांची पत्नी व ४ वर्षांच्या मुलीसोबत राहायचे. त्यांचे आई-वडील अंबाजोगाई येथे राहत होते. चार दिवसांपूर्वी आई आणि वडील त्यांना भेटण्यासाठी बीड येथे आले होते. सोमवारी ते भेटून परत गेले. बीड जिल्ह्यात केंद्रे यांचे गाव असल्यामुळे त्यांनी जळगाव येथून शिवाजीनगर, बीड येथे बदली करुन घेतली होती. कोणाचा तरी फोन आला की, ते तणावात यायचे. त्यांना कोणीतरी त्रास देत होते. याच त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा पोलीस ठाणे परिसरात होती.

Web Title: Policeman's suicide by firing on self in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.